धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्हयात लघूदाब वर्गवारीतील घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक प्रकारच्या वीजग्राहकांकडे सुमारे 79 कोटी 24 लाख रुपयांची वीजबिले थकीत असल्याने महावितरणची अतिशय गंभीर स्वरूपाची आर्थिक कोंडी झाली आहे. वीजखरेदीसह ग्राहकसेवेसाठी अत्यावश्यक असलेल्या दैनंदिन संचालन तसेच देखभाल व दुरुस्तीवर मोठा परिणाम होत आहे. या आर्थिक संकटावर मात करण्यासाठी सध्या थकबाकी वसुलीची मोहीम महावितरणकडून जिल्हयात प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. जे वीजग्राहक चालू देयकासह थकबाकी भरणार नाहीत अशा ग्राहकांचा वीजपुरवठा तात्काळ खंडीत केला जात आहे. गेल्या 29 दिवसात 238 ग्राहकांचा वारंवार सुचना देवूनही थकबाकी न भरल्यामुळे वीजपुरवठा खंडीत करण्यात आला आहे. 

महावितरणवर वाढत्या थकबाकीचा डोंगर कमी करण्याच्या दृष्टीने वसुली करण्यासाठी परिमंडळस्तरावरील अधिकाऱ्यांची विशेष पथके तयार करण्यात आली आहेत. लातूर परिमंडळाचे मुख्य अभियंता श्री सुंदर लटपटे यांच्या निर्देशानुसार धाराशिव जिल्हयातील वरचेवर वाढत जाणऱ्या थकबाकीसाठी विशेष परिश्रम घेतले जात असून जे वीजग्राहक चालू देयकासह थकबाकी भरणार नाहीत अशा ग्राहकांचा वीजपुरवठा तत्काळ खंडीत करण्याची आक्रमक कारवाई महावितरणकडून केली जात आहे. धाराशिव जिल्हयातील घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक वर्गवारीतील सुमारे 1 लाख 33 हजार 653 ग्राहकांकडे आज रोजी एकूण थकबाकी 79 कोटी 24 लाख रूपये एवढी आहे. या थकबाकीत धाराशिव विभागातील 74 हजार 973 घरगुती ग्राहकांकडील 35 कोटी 98 लाख रूपये, व्यावसायिक वर्गवारीतील 5 हजार 127 ग्राहकांकडील 3 कोटी 68 लाख रूपये तर 1 हजार 308 औद्योगिक ग्राहकांकडील 2 कोटी 80 लाख रूपयांच्या थकबाकीचा समावेश आहे. त्याचबरोबर तुळजापूर विभागातील 48 हजार 417 घरगुती ग्राहकांकडील 31 कोटी 13 लाख रूपये, व्यावसायिक वर्गवारीतील 3 हजार 101 ग्राहकांकडील 4 कोटी 16 लाख रूपये तर 727 औद्योगिक ग्राहकांकडील 1 कोटी 50 लाख रूपयांच्या थकबाकीचा समावेश आहे. गेल्या 29 दिवसात 238 ग्राहकांचा वीजपुरवठा खंडीत करण्यात आला आहे. यामधे  धाराशिव विभागातील 125 तर तुळजापूर विभागातील 51 वीजग्राहकांचा  तात्पुरत्या स्वरूपात तर 62 वीजग्राहकांचा कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडीत करण्यात आला आहे. 


थकबाकीसह चालू वीजबील भरण्याबाबत विविध माध्यमांद्वारे वीजग्राहकांना आवाहन केले जाते मात्र वीजग्राहक दुर्लक्ष करीत असल्यामुळे नाईलाजास्तव वीजपुरवठा खंडीत करण्याची कटू कारवाई करावी लागत आहे. इतर जीवनावश्यक गरजांना लागणारी रक्कम बाजूला काढून ठेवतो त्याप्रमाणेच वीजबीलाला प्राधान्यदेत वीजबिलाची रक्कम बाजूला काढून वेळेवर बील भरावे.  - सुंदर लटपटे, मुख्य अभियंता महावितरण लातूर परिमंडळ.



 
Top