धाराशिव/तुळजापूर (प्रतिनिधी)- अंतरवाली ते मुंबई मराठा आरक्षणसाठी मराठा संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली काढलेल्या पायी वारीत शनिवार दि. 20 जानेवारी रोजी प्रथम दिनापासुन तुळजापूर तालुक्यातील हजारो मराठा समाज बांधव मोठ्या संखेने सहभागी झाला आहे.
तुळजापूर तालुक्यातील मराठा समाज बांधवांनी शनिवारी राञी आंतरवाली सराटी येथे जावुन मनोज जरांगे पाटील भेट घेतली व चर्चा केली. मुंबईकडे मराठा आरक्षण आंदोलनसाठी जाण्यासाठी कुच करण्यापुर्वी तयारीची रुपरेषा मराठा संघर्ष योध्दा मनोज जरांगे यांच्या पुढे मांडली. यावेळी मी निघालो तुम्ही या असा संदेश दिला. यावेळी स्वराज्य संघटना जिल्हाध्यक्ष महेश गवळी, प्रवक्ते जीवनराजे इंगळे, कुमार टोले, अण्णासाहेब क्षिरसागर, सत्यजीत साठे यांच्या नेतृत्वाखाली हजारो मराठा समाज बांधव या पायी वारीत सहभागी झाले आहेत. काही समाज बांधव सोलापूर, पुण्यात या आरक्षण पायीवारीत सहभागी होणार आहेत. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी 26 जानेवारीपासून मुंबईत आंदोलनाचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी शनिवारी जिल्ह्यातील सुमारे एक लाख मराठा बांधव अंतरवली सराटी येथून जरांगे पाटील यांच्यासोबत मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत.
मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या, या मागणीसाठी मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी दोन वेळा उपोषण केले. शासनाला आरक्षणासाठी अल्टीमेटम दिल्यानंतरही आरक्षणाची मागणी पूर्ण झाली नसल्याने जरांगे पाटील यांनी 26 जानेवारीपासून मुंबईत आंदोलन करण्याचे बीड येथील सभेत जाहीर केले होते. 20 जानेवारी रोजी जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने रवाना होणार होते. त्यामुळे जिल्ह्यातील आठही तालुक्यातून हजारोंच्या संख्येने मराठा बांधवांनी मिळेल ते वाहन घेवून अंतरवाली सराटी गाव गाठले. जरांगे पाटील यांच्यासमवेत मुंबईकडे निघालेल्या मराठा बांधवांची संख्या 1 लाखाच्या जवळपास असल्याचा अंदाज मराठा आंदोलकांनी वर्तविला आहे.