तुळजापूर (प्रतिनिधी)- तालुक्यातील  अनेक साठवण तलावातील राजरोस  पाणी उपसा चालु असल्याने हिवाळ्यात च पाणीसाठा संपुष्टात येण्याची शक्यता आहे. त्यानंतर माञ भीषण पाणीटंचाई निर्माण होणार आहे. प्रशासन माञ  पाणी चोरांवर कारवाई करण्यास तयार नसल्याने तलावांवर विद्युत मोटारी संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या  साठवण तलावातील पाणी उपसु नये म्हणून  ग्रामपंचायत सातत्याने  विविध कार्यालयांना पाणी चोरांवर कारवाई करण्याची मागणी करीत असताना त्याची अजिबात दखल घेत जात नसल्याने पाणी चोर मंडळी विरोधात तक्रार देणाऱ्या मंडळीना दमदाटी केली जात आहे. 

पाणी चोरु नये म्हणून या खांबावरील विद्युत पुरवठा खंडीत केला तर दुसऱ्या विद्युत खांबावरुन  वायर टाकुन पाणीचोरी केली जात आहे. यात प्रामाणिकपणे तलावांवरील मोटारी काढणा-यांवर अन्याय करणारा प्रकार आहे. काक्रंबा ता. तुळजापूर परिसरातील काक्रंबा तलावावर वीस ते पंचवीस मोटारी टाकुन दररोज पाणीउपसा होत आहे. पण प्रशासन माञ यावर कारवाई करण्यास तयार नसल्याने दिवसेंदिवस पाणी चोरी वाढुन तलावातील पाणी साठा कमी होत आहे. तिर्थक्षेञ तुळजापूर शहर पंचक्रोषीत अशी अवस्था आहे. तर दूरवरच्या गावाच्या परिसरातील तलावांमधील पाणीसाठा काय असेल असा प्रश्न पडला आहे. पाणीउपसा असाच चालु राहिला तर माञ जनावरांनी पिण्यास पाणी मिळणे कठीण जाणार आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी या प्रकरणात लक्ष घालण्याची मागणी होत आहे.


पाणीसाठ्यांची तपासणी करुन कारवाई करा! 

उपलब्ध पाणीसाठी व या महिन्यात कमी झालेला पाणीसाठा तपासुन नियमापेक्षा अधिक पाणीसाठा कमी झाला असेल तर संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांवर प्रशासकीय कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांमधुन केली जात आहे.


 
Top