धाराशिव (प्रतिनिधी)- शहरातील अनंतदास महाराज स्मारक मंडळाच्या वतीने आयोध्या धाम येथे होत असलेल्या श्रीराम प्रभू च्या मंदिर लोकार्पणानिमित्त तीन दिवसीय रामोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यात धाराशिव जिल्ह्यातील कारसेवकांचा सत्कार, संगीतमय गीत रामायण, श्री रामरक्षा आणि मारुती स्तोत्राचे सामूहिक पठण यासह अयोध्येतील श्रीराम मंदिर लोकार्पण कार्यक्रमाचे एलईडी स्क्रीनवर थेट प्रक्षेपण या विविध कार्यक्रमांचा समावेश आहे.
या श्रीराम उत्सव सोहळ्यामध्ये शनिवारी 20 जानेवारीला सायंकाळी पाच वाजता अयोध्या येथे कारसेवेमध्ये सहभागी झालेल्या धाराशिव जिल्ह्यातील गावागावातील कार सेवकांचा सत्कार अनंतदास महाराज स्मारक मंडळाच्या वतीने करण्यात येणार आहे. या कार्यक्रमानंतर सायंकाळी साडेसहा ते नऊ वाजेपर्यंत संगीतमय गीतरामायणाचे सादरीकरण केले जाणार आहे. या श्रीराम उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी 21 जानेवारी रोजी रविवारी सकाळी 9 ते 11 या वेळेत श्रीरामरक्षा आणि श्री मारुती स्तोत्राचे सामूहिक पठण केले जाणार आहे. तर सोमवारी 22 जानेवारी रोजी सकाळी ते सहा ते सायंकाळी सात पर्यंत अखंड तेरा तास सामूहिक रामनाम जप यज्ञ होणार आहे. तर सकाळी 11 ते दुपारी दीड या वेळेत आयोध्या येथे संपन्न होत असलेल्या प्रभू श्री रामचंद्रांच्या मंदिर लोकार्पणाचे एलईडी वर थेट प्रक्षेपण केले जाणार आहे. दुपारी तीन वाजता श्रीराम चरित्र यावर सौ. वरदा चाकूरकर यांचे कीर्तनही होणार आहे. सायंकाळी पाच ते सहा या वेळेत श्री अनंतदास महाराज स्मारक मंडळातर्फे सर्व रामभक्तांच्या उपस्थितीत भव्य दीपोत्सव साजरा केला जाणार आहे.
या श्रीराम उत्सवाच्या निमित्ताने श्री अनंतदास महाराजांना दररोज पवमान अभिषेक केला जाणार आहे. तरी धाराशिव जिल्ह्यातील श्रीराम भक्तांनी या श्रीराम उत्सवांमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. तसेच धाराशिव जिल्ह्यातील ज्या कार सेवकांनी आयोध्या येथील कारसेवेत सहभाग दिला आहे अशा कार्सेवकांनी शनिवारी 20 जानेवारी रोजी होत असलेल्या कारसेवकांच्या सत्काराच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावे असे आवाहन श्री अनंतदास महाराज स्मारक मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.