परंडा (प्रतिनिधी) - श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ धाराशिव अंतर्गत शिक्षण महर्षी गुरुवर्य रा.गे. शिंदे महाविद्यालय परंडा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजी नगर यांच्या संयुक्त विद्यमाने सी व्ही रमण व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. व्याख्यानमालेच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनील जाधव हे उपस्थित होते.
यावेळी व्यासपीठावर उपप्राचार्य डॉ. महेशकुमार माने, सायन्स फोरमचे समन्वयक डॉ अक्षय घुमरे, सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ शहाजी चंदनशिवे, डॉ. सचिन चव्हाण, डॉ. विद्याधर नलवडे यांची उपस्थिती होती. व्याख्यानमालेसाठी पहिल्या सत्रामध्ये डॉ.भागोजीराव ताटे, भौतिकशास्त्र विभाग प्रमुख बलभीम महाविद्यालय बीड हे उपस्थित होते. त्यांनी विश्वाची निर्मिती कशा पद्धतीने झाली व गृह ताऱ्यांबद्दल असणाऱ्या श्रद्धा आणि अंधश्रद्धा याबद्दल विद्यार्थ्यांशी संवाद साधला. तर दुपारच्या सत्रामध्ये रामकृष्ण परमहंस महाविद्यालय धाराशिव येथील रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ. संदीप देशमुख हे होते. त्यांनी सी व्ही रमण यांच्या जीवनावरती प्रकाश टाकला व विद्यार्थ्यांना निरीक्षणाद्वारे करिअरच्या संधी कशा उपलब्ध होऊ शकतात याबद्दल सखोल असे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे आयोजन भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र व विज्ञान मंडळ यांनी केले होते.
यावेळी महाविद्यालयातील वरिष्ठ विभागातील विद्यार्थी विद्यार्थिनी प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दोन्ही सत्राचे सादरीकरण पावर पॉइंटच्या ऑनलाईन पद्धतीने सादर करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. विद्याधर नलवडे यांनी केले. तर प्रास्ताविक डॉ. महेशकुमार माने यांनी केले. पाहुण्यांचा परिचय डॉ. अक्षय घुमरे व डॉ. शहाजी चंदनशिवे यांनी विद्यार्थ्यांना करून दिला. शेवटी आभार डॉ. सचिन चव्हाण यांनी मानले. तांत्रिक सहकार्य डॉ. संतोष काळे, प्रा.राजुरे व हनुमंत कुटे यांनी केले.