धाराशिव (प्रतिनिधी)-जिल्ह्यात शासनाच्या विविध योजना राबविण्यात येत आहेत, त्यात मध्यंतरी कृषी विभागाकडून गावोगाव विविध योजनांची जनजागृती करण्यासाठी विकास रथ फिरला होता. त्यावर मोदी सरकार अशा नावाचे बॅनर झळकल्यावरुन अनेक ठिकाणी वादंग निर्माण झाले होते. त्यात आता धाराशिव जिल्ह्यात आरोग्य विभागाकडून केंद्र सरकारच्या आयुष्यमान भारत कार्डचे वाटप करण्यात येत आहे. या कार्डवर चक्क पक्षाच्या चिन्ह, भावी खासदार असा उल्लेख असून विशेष म्हणजे हे कार्ड आरोग्य विभागाच्या कर्मचा-यांकडून वाटप करण्यात येत आहे. त्यामुळे सरकार कोण्या एकट्या व्यक्तीचे आहे का? असा प्रश्न उपस्थित करून खासदार ओमराजेनिंबाळकर यांनी दिशा समितीच्या बैठकीत तीव्र नाराजी व्यक्त करत, संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली.

दिशा समितीची बैठक बुधवारी दि.16 रोजी दुपारपासून खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन सभागृहात 4 तास चालली. यावेळी आमदार कैलास पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता, उपजिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे, प्रांजल शिंदे आदी उपस्थित होते. बैठकीत प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, प्रधानमंत्री आवास योजना, स्वच्छ भारत मिशन, प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण, प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना, राष्ट्रीय ग्रामीण पाणीपुरवठा कार्यक्रम, प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना, स्वच्छ भारत मिशन ग्रामीण, राष्ट्रीय आरोग्य अभियान, ग्रामीण कौशल्य विकास, विविध विभागातील योजनेचा आढावा घेण्यात आला. यावेळी प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत जिल्ह्यात 233 कामे मंजूर होती त्यापैकी 176 कामे पुर्ण झाली असून 2 कामे रद्द केल्याचे सांगण्यात आले. शेतकऱ्यांचा राहिलेल्या पिक विम्याच्या रक्कमेबाबतही कृषी विभागाकडून आढावा घेण्यात आला. मातोश्री पाणंद रस्ते 618 मंजूर होते. त्यापैकी 114 कामे सुरु असून भूम तालुक्यात 19, कळंब 71, लोहारा 01, उमरगा 05, धाराशिव 36, परंडा 01 तर वाशी तालुक्यात 12 कामे चालू असल्याचे सांगण्यात आले. धाराशिव पंचायत समिती कामकाजाबाबत उपस्थित अनेक सरपंचानी तक्रारी उपस्थित केल्या. यावेळी गटविकास अधिकारी यांना महिन्यातून दोनवेळा बैठका घ्या, तसेच पुन्हा या गोष्टी होणार नाहीत याची दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. शहरी प्रधानमंत्री आवास योजना 10 हजार 378 चे उद्दीष्ट होते. त्यापैकी 5 हजार 920 लाभार्थी असून 345 प्रस्ताव रद्द झाले आहेत. ग्रामीण पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत 14 हजारापैकी 1019 घरगुले मंजूर झाल्याचे सांगण्यात आले. तसेच धाराशिव शहरात सदनिके अंतर्गत 819 लाभार्थ्यांना घरे देण्यात येणार आहेत. त्यासाठी 1300 अर्ज प्राप्त झाले होते. काहींना हप्ता भरताना अडचण आली तर म्हणून अतिरिक्त 900 अर्ज घेण्यात आले आहेत. यावेळी शहरातील कचरा विषयी पण चर्चा करण्यात आली.


उमरगा-सोलापूर महामार्ग फेब्रुवारी अखेर करा

उमरगा-सोलापूर राष्ट्रीय महामार्गाचे काम 2014 पासून अद्यापपर्यंत पूर्ण झाले नाही. यामुळे अनेकांचे अपघात होवून मृत्यू झाला आहे. याबाबत टोलबंद करण्यात आला. त्यावेळी तात्काळ काम करण्याचे आश्वासन दिले. मात्र अद्यापही काम झाले नाही. त्यामुळे खासदार म्हणून काय करायला पाहिजे, मारायला यायला पाहिजे का? असा सवाल खासदार राजेनिंबाळकर यानी केला. यावेळी संबधित अधिकाऱ्याकडून तांत्रिक अडचणी सांगत मार्चपर्यंत काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. यावरुन खासदारांनी येत्या फेब्रवारी अखेरपर्यंत काम पूर्ण करा, अन्यथा टोल बंद करण्यात येईल, असा इशारा दिला आहे.


 
Top