धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्ह्याचे मागासलेपण दूर करण्यासाठी आणि नागरीकांचे जीवनमान उंचावण्यासाठी विविध यंत्रणांनी सुक्ष्म नियोजनातून काम करावे.शासनाच्या विविध योजना,उपक्रम व अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करावी. यासाठी वेळोवेळी लोकप्रतिनिधी यांचे मार्गदर्शन व सहकार्य घ्यावे. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांनी एकत्र येवून काम करुया आणि यामधून देशाचे उज्ज्वल भविष्य घडवूया असे आवाहन पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजीराव सावंत यांनी केले.
आज 75 व्या भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 74 व्या वर्धापन दिनाचा मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर संपन्न झाला. ध्वजारोहणानंतर उपस्थितांना संबोधित करतांना पालकमंत्री प्रा.डॉ.सावंत बोलत होते.यावेळी ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक भास्करराव नायगांवकर,खा.ओमप्रकाश राजेनिंबाळकर,आ.कैलास घाडगे-पाटील,आ.राणाजगजितसिंह पाटील,जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे,जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता,पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी,अप्पर जिल्हाधिकारी शिवाजी शिंदे,निवासी उपजिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी शिरीष यादव,उपजिल्हाधिकारी संतोष भोर,राजकुमार माने यांची प्रमुख उपस्थिती होती.
पालकमंत्री प्रा.डॉ.सावंत बोलताना पुढे म्हणाले की,महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा 350 वा शिवराज्यभिषेक सोहळा विविध कार्यक्रमांनी यावर्षी मोठ्या उत्साहात यावर्षी साजरा करण्यात येत आहे.यानिमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजाच्या जीवन प्रसंगावर आधारीत महानाट्य आणि महाराष्ट्राच्या समृध्द संस्कृतीची ओळख व्हावी यासाठी महासंस्कृती महोत्सवाचे देखील आयोजन राज्यात करण्यात येत आहे.‘शासन आपल्या दारी' या उपक्रमाच्या माध्यमातून विविध लोककल्याणकारी योजनांची माहिती लाभार्थ्यांना देवून विविध योजनांचा लाभ देखील देण्यात येत असल्याचे सांगितले.
जिल्ह्यातील महिलांच्या आरोग्यासाठी विशेष मोहिम “माता सुरक्षित, घर सुरक्षित“ या मोहिमेव्दारे शहरी भागातील एकूण 83 हजार 848 मातांची मोफत आरोग्य तपासणी करुन 157 मातांच्या मोफत शस्त्रकिया करण्यात आल्याचे सांगून प्रा.डॉ सावंत पुढे म्हणाले,“जागरूक पालक सदृढ बालक“ ही मोहिम राबविण्यात आली. 18 वर्षावरील पुरुषांच्या सर्वांगीण आरोग्य तपासणीसाठी 17 सप्टेंबर 2023 रोजी “निरोगी आरोग्य तरूणाईचे वैभव महाराष्ट्राचे“ ही मोहिम सुरु करण्यात आली.या मोहिमेमध्ये आतापर्यंत 4 लाख 29 हजार 539 इतक्या पुरुषांची तपसणी करून उपचार करण्यात आले.
प्रथमच फिरता दवाखाना
जिल्ह्यातील दुर्गम भागातील नागरीकांना त्यांच्या गावातच आरोग्य सेवा मिळावी या दृष्टीकोनातून धाराशिव जिल्ह्यात प्रथमच “फिरता दवाखाना स्थापन करण्यात आला. शासन पुरस्कृत प्रधानमंत्री आयुष्मान भारत हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर मिशन या योजनेअंतर्गत 50 खाटांच्या क्रिटीकल केअर युनिटचे बांधकाम करण्यासाठी रक्कम 23 कोटी 75 लाख रुपये,प्रधानमंत्री आयुष्यमान भारत हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर मिशन या योजनेअंतर्गत 1 कोटी 25 लाख, राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत 1 कोटी रुपये इतके अनुदान मंजूर झाले असल्याचे त्यांनी सांगितले.