उमरगा (प्रतिनिधी)-आई वडील घरी नसलेला फायदा घेत अल्पवयीन मुलीवर बलात्कार केलेप्रकरणी तालुक्यातील मुळज येथील आरोपीस उमरगा येथील विशेष जिल्हा न्यायाधीशांनी 10 वर्षे सक्त मजूरी व 40 हजार दंड ठोठावल्याची माहिती सहा. शासकिय अभियोक्ता संदिप देशपांडे यांनी दिली आहे.

अतिरिक्त शासकिय अभियोक्ता संदिप देशपांडे यांनी दिलेली माहिती अशी की, मुळज ता. उमरगा येथे अल्पवयीन मुलगी ही घरी एकटीच होती. तिचे आई वडील 10 सप्टेंबर 2022 रोजी दु. 3:30 वाजता त्यांच्या शेतात जाण्यासाठी निघाले होते. अंदाजे एक किलोमिटर गेल्यानंतर अचानक पाऊस आला. त्यामुळे ते दोघेही शेताकडे न जाता दुपारी 4:00 वाजता घराकडे परत आले. यावेळी त्यांच्या घराचा दरवाजा बंद होता. आईने मुलीला हाक मारली असता, मुलीने दरवाजा उघडला. यावेळी ती घाबरली होती. व घरात आरोपी संजय गंगथडे घरात पलंगावर बसलेला होता. आईने पिडीत मुलीस काय झाले असे विचारले असता, तिने सांगितले की, आरोपी संजय शिवाजी गंगथडे अचानक घरी आला व त्याने आतून दार बंद करुन कोंडी लावली व जबरदस्तीने त्या मुलीच्या अंगावरील कपडे काढून बलात्कार केला आहे. त्यावेळी पीडितेच्या आईने संजयला असे का केले असे विचारले असता त्याने तुला काय करायचे ते कर असे म्हणून पळून गेला. पीडितेच्या आईने पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्यावर संजय गंगथडे याच्यावर गुन्हा नोंद झाला. तपासाअंती आरोपीविरूध्द येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात दोषारोपत्र दाखल करण्यात आले होते. दि. 30 जानेवारी रोजी या प्रकरणाची जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्यासमोर सुनावणी झाली. शासनातर्फे 11 साक्षीदार तपासण्यात आले. आरोपीतर्फे पीडितेच्या वडिलांना तपासण्यात आले. त्यापैकी साक्षीदार डॉ. प्रविण जगताप, डॉ. जगन्नाथ कुलकर्णी, पीडित अल्पवयीन मुलगी, पोलिस हेडकॉन्स्टेबल संतोष बोयणे व तपास अधिकारी तत्कालीन सपोनि अनुसया माने यांची साक्ष महत्वपूर्ण ठरली. न्यायालयासमोर आलेला पुरावा व सहा. शासकीय अभियोक्ता संदीप देशपांडे यांनी केलेला युक्तीवाद ग्राह्य धरत विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. के. अनभुले यांनी आरोपी संजय शिवाजी गंगथडे याला दहा वर्षे सक्तमजुरी आणि 40 हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली. 


 
Top