भूम (प्रतिनिधी)- माझ्या चारित्र्यावर संशय घेतो म्हणत पत्नीने साथीदारांच्या मदतीने काढला पतीचा काटा काढल्याची घटना तालुक्यातील पाटसांगवी येथे घडली. या प्रकरणी पोलिसांनी योगिता भगवान मिसाळ, रविराज भगवान मिसाळ, अन्य दोन अनोळखी इसमाविरुद्ध भादवि 302, 323, 504, 506, 34 अन्वये गुन्हा नोंद केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मयत भगवान मिसाळ वय 35 याची पत्नी योगिता, मुलगा रविराज व अन्य दोघांनी दिनांक 16 जानेवारी रोजी मयत भगवान यास रात्री साडेनऊच्या सुमारास काठीने लाथा बुक्कीने मारहाण करण्यास सुरुवात केली. याचा आरडाओरडा ऐकू आल्यावर दत्ता श्रीराम नायकिंदे, अमोल जयराम नायकिंदे, ज्ञानेश्वर महादेव नायकिंदे, कृष्णा रामहरी मिसाळ मयत भगवान यांच्या घराच्या पाठीमागे पोचल्यानंतर मयताची पत्नी योगिता, मुलगा रविराज व अन्य दोन साथीदार मयत भगवान यास मारहाण करत असल्याचे त्यास दिसून आले. ते म्हणत होते की आज याला जिवंत सोडायचे नाही असे म्हणत जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने जोराने काठीने व लाथा बुक्क्याने मारहाण करत होते. यावेळी माझ्या चरित्रावर संशय घेतो काय असे म्हणत त्याची पत्नी मारहाण करत होती. यावेळी साक्षीदार भांडण सोडवण्यास गेले असता आज कोणी भांडण सोडवण्यास येईल त्याचे नाव घेऊन त्याच्यावरच केस करीन असे मयताची पत्नी योगिता म्हणत असल्याने साक्षीदार हे भांडण सोडवण्यास गेले नाहीत. यावेळी भगवान हा बेशुद्ध पडल्याने त्याला जास्त मारहाण झाल्याने त्याची बायको योगिता मुलगा, रविराज व सासरा बबन नायकिंदे यांनी गावातील सुहास मिसाळ याच्या वाहनातून मयत भगवान यास बार्शी येथे उपचाराकरिता कर्मवीर मामासाहेब जगदाळे दवाखान्यात घेऊन गेले. अशा आशयाची फिर्याद मयताची बहीण रेखा तुकाराम गुंड राहणार जामखेड यांनी दिली आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कुणाल सूर्यवंशी हे करीत आहेत.