सोलापूर (प्रतिनिधी)-आर्थिक वर्ष पूर्ण होण्यास अजून अडीच महिने शिल्लक असताना मध्य रेल्वेने 2023-24 या आर्थिक वर्षासाठी रेल्वे बोर्डाचे भंगार विक्रीचे लक्ष्य पार करणारी पहिली क्षेत्रिय रेल्वे होण्याचा टप्पा गाठला आहे.
मध्य रेल्वेने आर्थिक वर्ष 2023-24 साठी रु.300 कोटींचे भंगार विक्रीचे उद्दिष्ट ओलांडून रु.300.43 कोटी मिळवले आहेत. एप्रिल ते डिसेंबर-2023 या कालावधीतील विक्रीच्या उद्दिष्टापेक्षा 32.23% वाढ झाली आहे जी सर्व क्षेत्रिय रेल्वेंमध्ये सर्वाधिक आहे.
मध्य रेल्वेने या कामाला प्राधान्य देऊन जुने इंजिन्स, अतिरिक्त डिझेल इंजिन, वापरात नसलेले जुने रेल्वे रुळ व जुने आणि अपघाती इंजिन/डब्बे यासह विविध प्रकारचे भंगार ओळखून त्यांची विल्हेवाट लावण्यासाठी महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत. विक्रीद्वारे हे साध्य झाले आहे.
रेल्वेचे एकूण 22,343 मेट्रिक टन, 23 इंजिन, 252 डब्बे, आणि 144 मालवाहू वॅगन (भुसावळ विभागातील 12 किमी जामनेर-पाचोरा सेक्शन नॅरो गेज रुळांसह) शून्य भंगार मोहिमेसाठी 300.43 कोटी रुपयांचा भंगार विक्री उत्पन्न खालीलप्रमाणे आहे.
भुसावळ विभागाने 59.14 कोटी रुपयांची भंगार विक्रीचे लक्ष गाठले, माटुंगा डेपोने 47.40 कोटी रुपयांची भंगार विक्री केली, मुंबई विभागाने 42.11 कोटी रुपयांची भंगार विक्री केली. पुणे विभागाने 32.51 कोटी रुपयांची भंगार विक्री केली. भुसावळच्या इलेक्ट्रिक लोको शेड डेपोने 27.23 कोटी रुपयांची भंगार विक्री केली. सोलापूर विभागाने 26.73 कोटी रुपयांची भंगार विक्री केली. नागपूर विभागाने 24.92 कोटी रुपयांची भंगार विक्री केली, आणि मध्य रेल्वेवर इतर ठिकाणी एकत्रितपणे रु.40.39 कोटींची भंगार विक्री झाली आहे.
या यशाचे संपूर्ण श्रेय सर्व विभाग, कार्यशाळा आणि शेड यांच्या एकत्रित प्रयत्नांचे, त्यांनी भंगार साहित्य दूर करण्यासाठी अथक परिश्रम घेतले आणि त्याद्वारे शून्य भंगार मोहिमेला मोठे यश मिळवून देण्यात योगदान दिले. शून्य भंगार मोहिमेच्या कक्षेत सर्व विभाग आणि डेपोंना भंगारमुक्त करण्यासाठी मध्य रेल्वे आपल्या वचनबद्धतेवर ठाम आहे.