धाराशिव (प्रतिनिधी)- तुळजापूर तालुक्यातील अणदुर येथे चिवरीपाटी ते अणदूर रस्ता, निळकंठेश्वर मठ सभागृह व महिला भक्त निवासाचे लोकार्पण आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. चिवरीपाटी ते अणदूर रस्ता सुधारणे करिता ग्रामस्थांकडून सातत्याने मागणी करण्यात येत होती. आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी या कामासाठी रु. 20 लक्ष उपलब्ध करून दिले होते. यासह आमदार स्थानिक विकास निधी मधून रु 10 लक्ष देण्यात आलेल्या निळकंठेश्वर मठा समोरील सभागृह व तीर्थक्षेत्र विकास निधी मधून रु 16 लाख देण्यात आलेल्या भक्त निवासाचे लोकार्पण त्यांच्या हस्ते करण्यात आले.
खंडोबा मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यासाठी पर्यटन विभागाच्या माध्यमातून रुपये 2 कोटी मंजूर करून घेण्यात आले असून, या कामाच्या निविदा प्रक्रियेचे काम सुरू आहे. यातून राष्ट्रीय महामार्ग ते मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दुपदरीकरणाचे काम करण्यात येणार आहे. सदरील रस्ता दुतर्फा सिमेंट काँक्रीटचा होणार असून रस्त्याच्या दुभाजकावर आकर्षक पथदिवे बसण्यात येणार आहेत. या रस्त्याच्या कामामुळे गावाच्या सौंदर्यात मोठी भर पडणार असून व्यापारी, ग्रामस्थांसह भाविकांची देखील सोय होणार आहे. या रस्त्याची त्यांनी पाहणी केली.
राज्यातील लाखों भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या खंडोबा मंदिराचा परिपूर्ण विकास आराखडा तयार करण्यात येणार आहे. या अनुषंगाने मंदिराचे विश्वस्त व प्रतिष्ठित व्यक्तीं समवेत लवकरच बैठक आयोजित करण्यात येईल. या बैठकीमध्ये मंदिर विकासाबाबत चर्चा करून आराखडा बनविण्यात येणार आहे.
सदरील कार्यक्रमास भाजपा जिल्हा सरचिटणीस अँड दिपक आलुरे, जिल्हा चिटणीस साहेबराव घुगे, काशीनाथ शेटे, शिवाजीराव घुगे गुरुजी, दिपक घोडके, प्रविण घोडके, राजकुमार गोवे, राहुल राठोड, सोमनाथ लंगडे, खंडोबा देवस्थान ट्रस्टचे चेअरमन बालाजी मोकाशे, अविनाश मोकाशे, दिपक मोकाशे, बालाजी कुलकर्णी, निलेश आलुरे, राजेंद्र सुर्यवंशी, शिवकुमार स्वामी, इमाम शेख, दिपक घुगे, लक्ष्मण बोंगरगे यांच्या सह नागरिक उपस्थित होते.