भूम (प्रतिनिधी)-शहरातील तहसील कार्यालयाच्या समोर नगरपरिषदेमार्फत महात्मा बसेश्वर यांच्या नावाने शॉपिंग सेंटर उभा करण्यात आलेले होते. या शॉपिंग सेंटर मध्ये भूम शहरातील व्यापाऱ्यांनी ही लिलावाद्वारे लाखो रुपये खर्च करून नगरपरिषदेकडून गाळे घेतले आहेत. पण सध्या या शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणात पत्राचे शेड मारून अवैधपणे अतिक्रमणे करून दुकाने थाटली जात आहेत. त्यामुळे या शॉपिंग सेंटरकडे जाणारा रस्ता ही बंद झालेला आहे. भूम नगर परिषदेचे मुख्याधिकारी रजेवर असल्यामुळे सध्या तात्पुरता पदभार परंडा मुख्याधिकारी यांच्याकडे देण्यात आलेला आहे.
परंडा मुख्याधिकारी आठवड्यातून एकच दिवस नगरपालिकेमध्ये येत असल्यामुळे मनमानी अतिक्रमणे वाढत आहेत. शहरात कोणी कुठेही रस्त्याच्याकडेला एका रात्रीत पान टपऱ्या आणि पत्र्याचे शेड उभा करून दुकाने थाटली जात आहेत. यामुळे शहराचे विद्रूपीकरण होताना दिसत आहे. तसेच अतिक्रमणे वाढल्यामुळे रस्त्यावर चालताना नागरिकांनाही त्याचा परिणाम होत आहे. या सर्व अतिक्रमणाकडे नगरपरिषद जाणून बुजून दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे. याबाबतीत सर्वपक्षीय पदाधिकारी यांनी भूम नगर परिषदेमध्ये निवेदन सादर केलेले आहे. दि.9 जानेवारी 2024 पर्यंत महात्मा बसेश्वर शॉपिंग सेंटरच्या आजूबाजूचे सर्व अतिक्रमणे काढण्यात यावीत. अन्यथा उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार असल्याचे त्यांनी निवेदनात म्हटले आहे. या निवेदनावर काँग्रेस तालुका अध्यक्ष रुपेश आप्पा शेंडगे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष विनोद नाईकवाडी, भाजप तालुका सरचिटणीस संतोष सुपेकर, राष्ट्रवादीचे युवा नेते आबासाहेब मस्कर, ऑल इंडिया पँथर सेनेचे मराठवाडा कार्याध्यक्ष चंद्रमणी गायकवाड, अमोल सुरवसे, बापूराव शेंडगे, महादेव जाधव, पिंटू गवळी आदी पदाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत.