धाराशिव (प्रतिनिधी)-नगर पालिका धाराशिव यांना विविध विकास कामासाठी आलेला निधी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग केल्याने पालकमंत्री डॉ. तानाजी सावंत यांची शिवसेना व भाजप एकत्र आले आहेत. तर ठाकरे गट शिवसेना व काँग्रेस एकत्र येवून एकमेंकावर टिकेची झोड उठवत आहेत. केवळ विकास कामांच्या निधीवरून चांगले राजकारण पेटल्याचे दिसून येत आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे अमित शिंदे, ठाकरे शिवसेनेचे सोमनाथ गुरव व काँग्रेसचे खलील सय्यद यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात पालकमंत्री डॉ. तानाजीराव सावंत यांच्या दबावाखाली जिल्हाधिकारी काम करीत असून, शहरातील नागरी समस्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या पालकमंत्र्यांवर बेशरम्याची फुले उधळून स्वागत करू अशा इशारा शहरवासियांच्यावतीने दिला आहे. पालकमंत्री व सत्ताधारी आमदार यांच्या दबावामुळे 10 लाखाच्या आतील कामांच्या शिफारसी रातोरात वाटल्या असा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे.

याला उत्तर म्हणून भाजपाचे माजी उपनगराध्यक्ष तथा भाजपाचे शहराध्यक्ष अभय इंगळे यांनी महाराष्ट्रात अडीच वर्षे महाविकास आघाडी सरकारची सत्ता होती. तेव्हाच्या काळात तुम्ही काय दिवे लावले. धाराशिव जिल्ह्यासाठी निधी मंजुरीच्या नुसत्याच घोषणा केल्या. ज्यांना शरम वाटत नाही त्यांच्याकडून हे अपेक्षित होते. कोणेतरी सालगडी म्हणून काम करीत असणाऱ्या अशा लोकांकडून काय अपेक्षित आहे. महायुतीच्या काळात धाराशिव शहराला मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाल आहे. त्यामुळे नौटंकी बाझांनी आपल्या काळात किती कामे झाली, निधी कोणाच्या घशात गेला, त्यानंतरच महायुतीच्या सरकारवर आरोप करावेत. अशी टिका केली आहे.

पालकमंत्री डॉ. तानाजी सावंत गटाचे शिवसेना जिल्हाप्रमुख सुरज साळुंके यांनी खासदार, आमदारांना थेट आवाहन देत बगलबच्च्यांना पुढे करून आंदोलनाचे नाटक करीत आहेत. धाराशिव नगर परिषदेतील भ्रष्ट्राचाराबाबत अनेक अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामुळे नगर विकास खात्याच्या आदेशानेच 10 लाखाच्या खालील टेंडर प्रक्रिया सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यात आलेली आहे असे स्पष्टपणे साळुंके यांनी सांगितले आहे.



 
Top