भूम (प्रतिनिधी)-शासनाच्या शेतकरी विरोधी एक ना अनेक निर्णयाच्या विरोधामध्ये शेत जमीन व घरदार आणि शेतात असणारी दुधाळू जनावरे (गाई, म्हशी) ही सर्व सरकारने जमा करून घ्यावी. माझ्या पूर्ण कुटुंबाला “सामूहिक आत्महत्या“ करण्याची परवानगी मिळावी अशी मागणी उपविभागीय अधिकारी भूम यांच्याकडे आष्टा तालुका भूम येथील शेंतकरी सतीश कदम यांनी केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, मी सतीश बंडू कदम आपणास विनंती करतो की मी एक शेतकरी असून माझ्या कुटुंबाचा पूर्ण चरितार्थ हा शेतीवर आधारित आहे. सध्या माझ्या शेतामध्ये द्राक्ष व कांदा ही पिके आहेत तसेच शेतीला पूरक व्यवसाय म्हणून माझ्या शेतामध्ये गाई आणि म्हशी दूध उत्पादनासाठी आहेत. परंतु सद्यस्थितीमध्ये मी शेतीच्या बाबतीत सरकारच्या उदासीन धोरणामुळे हाताश झालेलो आहे.

माझ्या शेतामध्ये द्राक्ष हे पीक आहे. द्राक्ष बाग उभी करत असताना संबंध उभ्या आयुष्याची कमाई त्या बागेला खर्च करावी लागते आणि नंतर पुन्हा वार्षिक संगोपनासाठी साधारणताः एकरी अडीच ते तीन लाख रुपये खर्च करावे लागतात. मग वर्षभर तळहातातल्या फोडासारखे जपल्याच्या नंतर त्याचे कुठे चार पैसे आम्हा शेतकऱ्यांच्या हातात येतात. परंतु “निसर्गाची अवकृपा“ याला सरकार काही करू शकत नाही हे आम्ही समजून आहोत. एक तर सद्यस्थितीमध्ये यावर्षी दुष्काळी स्थिती आहे. त्यात पुन्हा अवकाळीप पाऊस त्यामुळे द्राक्ष बागेचे आतोनात नुकसान झाले आहे, दुधाला भाव नाही, त्यामुळे लहान मुलांना अनाथ आश्रमात सोडून आम्हा तिघांना आत्महत्या करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी सतीश कदम यांनी केली आहे.


शासनाकडून अपेक्षा

शासनाने ताबडतोब कांद्यावरची निर्यात बंदी उठवावी आणि कसल्याही प्रकारच्या आयात शुल्क लावू नये. शासनाने दुधाचे दर कायम करून किमान 40 रुपये स्थिर ठेवावे. आमचा भूम तालुका आणि धाराशिव जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करावा, आणि चाऱ्यांच्या छावण्या न देता पशुपालकांच्या खात्यावर डायरेक्ट मदत जमा करावी. अवकाळी पावसामुळे नुकसान ग्रस्त द्राक्ष व ईतर फळबाग उत्पादक, तसेच इतर पिके उत्पादक शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत द्यावी.1- 3.50 तीन महिन्यांसाठी जाहीर केलेले कांद्याचे अनुदान जे राहिलेले लाभार्थी आहेत त्यांना एक रकमी द्यावे अशी मागणी निवेदनात सतिश बंडू कदम, मु.पो.आष्टा.ता.भूम. जि.धाराशिव यांनी केली आहे.


 
Top