नळदुर्ग (प्रतिनिधी)- उपग्रहाच्या माध्यमातुन घेतलेल्या छायाचित्रांचे मायक्रो डिटेक्शन होण्यासाठी केंद्र शासनाच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाने 23 कोटी रुपये खर्चाच्या वेगवेगळ्या पातळ्यांवरील एक प्रकल्प जाहीर केला होता. त्यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील संगणक शास्त्राचे तत्कालीन विभाग प्रमुख तथा लोणारे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. के. व्ही. काळे यांच्या संशोधकांच्या टीमने छायाचित्रांचे मायक्रो डिटेक्शन करणारे डीएसटी निसा सॉफ्टवेअर विकसित केले होते. त्याला दि.7 डिसेंबर रोजी केंद्र शासनाच्या पेटंट कार्यालयाचे पेटंट जाहीर झाले आहे. या टीममध्ये लोहगाव ता. तुळजापूर येथील डॉ. महेश माधवराव सोलंकर यांचा समावेश आहे. डॉ. महेश सोलंकर यांच्यामुळे देशासह परदेशात तुळजापुर तालुक्याचे नाव उज्वल झाले आहे.
उपग्रहाच्या माध्यमातुन मिळणाऱ्या छायाचित्रांचे विश्लेषण करण्यासाठी भारताला अमेरिकेच्या तंत्रज्ञानावर अवलंबुन राहावे लागत होते.या प्रकल्पाचे प्रो. बी. के. मोहन समन्वयक तर कुलगुरू डॉ. के. व्ही. काळे सहसमन्वयक होते. यातील डॉ. काळे यांच्या टीममध्ये संशोधक विद्यार्थी डॉ. महेश सोलंकर,धनंजय नलावडे, हनुमंत गीते आणि रुपाली सुरासे यांनी काम केले आहे. या टीमने तयार केलेल्या सॉफ्टवेअरच्या माध्यमातुन अतीशय क्लिष्ट अशा छायाचित्रांचेही तात्काळ विश्लेषण केले जाते.त्याचबरोबर दुष्काळ, पिकांची नासाडी,पिकांवर पडलेल्या रोगराईचा शोध घेण्यासह रोगाची तीव्रताही समजुन घेता येणार आहे. हे सॉफ्टवेअर देशातील सर्वच संशोधकांना संशोधनासाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे.