धाराशिव (प्रतिनिधी)-  भविष्यातील स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी विद्यार्थ्यांनी स्पर्धापरीक्षा शालेय स्तरापासूनच देणे गरजेचे असल्याचे मत आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाच्या संस्था सरचिटणीस प्रेमाताई सुधीर पाटील यांनी व्यक्त केले. तसेच आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाने त्यासाठी चालू केलेल्या गुरुवर्य के.टी. पाटील फाउंडेशन वर्गाची माहिती दिली. येथील नूतन प्राथमिक विद्यामंदिर मधील गुरुवर्य के.टी. पाटील प्रज्ञाशोध परीक्षेतील गुणवंतांचा सत्कार सोहळा संपन्न झाला. 

यावेळी प्रशालेतील केंद्रस्तरीय, जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय गुणवत्ताधारक झालेल्या 31 गुणवंत विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाच्या संस्था सरचिटणीस सौ.प्रेमाताई सुधीर पाटील यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्ष म्हणून उपस्थित होत्या. तर प्रशालेचे मुख्याध्यापक प्रदिपकुमार गोरे, गुरुवर्य के.टी. पाटील प्रज्ञाशोध परीक्षेचे जिल्हा समन्वयक राम मुंडे, पालक प्रतिनिधी मैनुद्दीन शेख, प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी व्हावी यासाठी घेण्यात आलेल्या या परीक्षेत गुणवत्ताधारक झालेल्या विद्यार्थ्यांना यावेळी मान्यवरांनी मार्गदर्शन केले. यावेळी कार्यक्रमास प्रशालेतील सर्व शिक्षक, पालक व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती तृप्ती तिकोने यांनी केले. तर आभार प्रदर्शन श्रीमती चित्रा सोनटक्के यांनी केले.


 
Top