धाराशिव (प्रतिनिधी)-ढोकी, तेर आणि पंचक्रोशीतील जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या ढोकी रेल्वे स्टेशनवर सर्व एक्सप्रेस गाड्यांना थांबा मिळावा. या मागणीसाठी कृती समितीने भेट घेतली आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे याबाबत पाठपुरावा करावा अशी विनंती करण्यात आली. 

निवेदनात म्हंटले आहे की, ढोकी रेल्वेस्टेशन धारुर, केज, कळंब, मुरुड, गोविंदपूर, देवधानोरा, माळकरंजा, तेर, देवळाली, ढोकी व आसपासच्या 30 गावातील नागरिक, व्यापारी व ग्रामस्थांना सोयीचे आहे. या ठिकाणाहून हैद्राबाद, मुंबई, पुणे, अमरावती, कोल्हापूर, नागपूर आदी शहराला ये-जा करण्यासाठी ढोकीसह परिसरातील प्रवाशांना रेल्वे अभावी वाढीव खर्चाचा भूर्दंड सहन करावा लागत आहे. या रेल्वेस्टेशनवरुन जवळपास 25 रेल्वे गाड्या धावतात. यापैकी केवळ दोनच लोकल गाड्यांना थांबा आहे. उर्वरित एकही गाडी थांबत नसल्याने या रेल्वेस्थानकाचा परिसरातील प्रवाशांना उपयोग होत नाही. ढोकी येथे लातूर ते धाराशिव दरम्यान एकमेव सी क्लास स्टेशन असून या ठिकाणी रेल्वेचे 3 ट्रॅक आहेत. गेल्या 15 वर्षापासून ढोकी येथे थांबा व्हावा म्हणून परिसरातील 60 ते 70 गावातून मागणी होत आहे.

निवेदनाची दखल घेत लवकरच केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे व रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून ढोकी येथे एक्सप्रेस रेल्वे गाड्यांच्या थांब्यासाठी पाठपुरावा करण्याची ग्वाही शिष्टमंडळाला दिली. याप्रसंगी कृती समितीचे सर्व सदस्य, प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


 
Top