धाराशिव (प्रतिनिधी) - शहरातील ख्वॉजा नगरसह विविध भागांमध्ये कचरा उचलण्यासाठी असलेली घंटागाडी फिरकत नसल्यामुळे शहरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. तो कचरा येत्या तीन दिवसात उचलण्यात यावा. अन्यथा शहरवासियांच्यावतीने आंदोलन करण्यात येईल असा इशारा मुख्याधिकारी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे नागरिकांनी दिला आहे.
दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, शहरातील साफसफाई करण्यासाठी कचरा (घंटागाडी) ची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र कचरा उचलणारी घंटागाडी शहरातील ख्वॉजा नगर, मदीना चौक, म्हसोबा चौक, गणेश नगर, गाजी स्कूल समोरील परीसस, दर्गाह परिसर, विजय चौक, फरशी गल्ली व इदगाह भागासह इतर परिसरात फिरकतच नाही. त्यामुळे सर्वत्र कचऱ्याचे ढीग साचून दुर्गंधी पसरली व पसरत आहे. त्यामुळे तो कचरा उचलून शहरातील सर्व साफसफाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे. जर कचरा उचलण्याकडे दुर्लक्ष केले तर शहरवासियांच्यावतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला आहे. यावर खादर खान, इस्माईल शेख, अतिक शेख, बाबा मुजावर, खलीफा कुरेशी व राम साळुंके आदींच्या सह्या आहेत.