धाराशिव (प्रतिनिधी)- केंद्र सरकारच्या अमेरिका धार्जिण्या नवीन आर्थिक धोरणाची विषारी फळ आता भारतातील फक्त उच्च -मध्यमवर्गीय व काही मूठभर भांडवलदार सोडले तर शहरी आणि ग्रामीण जनतेलाच चाखावी लागत आहेत. गेल्या नऊ वर्षात केंद्र सरकारचा उदो उदो करणाऱ्या मध्यम वर्गाला देखील महागाईचे चांगलेच चटके बसू लागले आहेत. यास सर्वस्वी केंद्र सरकारचे चुकीचे आर्थिक धोरणच जबाबदार असल्याचा आरोप समाजवादी पार्टीचे प्रदेश महासचिव तथा प्रवक्ते ॲड रेवण भोसले यांनी केला आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमती वाढल्याचा बागुलबुवा व अन्नधान्याच्या अपुऱ्या उत्पादनामुळे वाढलेल्या आयातीच्या खर्चाचे कारण पुढे केले असले तरी महागाई वाढण्यास केंद्र सरकारच जबाबदार आहे. नोटाबंदी व जीएसटी तसेच आर्थिक विकासाचा फुगा फुटला असून सततची पेट्रोल -डिझेल दरवाढ व जीवनावश्यक वस्तूंची टंचाई, यामुळे देशातील जनता मेटाकुटीला आली आहे. जनतेने ठरवून एक दिवस सर्व वाहन रस्त्यावर सोडून देऊन निघून जावे,हे आंदोलन सर्व राज्यभर झाल्यास केंद्र व राज्य सरकारने जो अवाजवी कर लावून पेट्रोल- डिझेलचे दरवाढ केलेले आहे. ती कमी केल्याशिवाय रस्त्यावरील वाहन काढू नयेत असे आवाहनही ॲड भोसले यांनी केले आहे.
