धाराशिव (प्रतिनिधी)- येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली किडनी विकार मार्गदर्शन शिबिर आणि माजी विद्यार्थी मेळावा घेण्यात आला.
यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून रामकृष्ण परमहंस महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी डॉ. सुहास बावीकर हे लाभले होते. डॉ. सुहास बावीकर हे छत्रपती संभाजीनगर येथील सुप्रसिद्ध नेफ्रॉलॉजिस्ट म्हणून ओळखले जातात. त्यांनी आत्तापर्यंत तेराशे पेक्षा जास्त रुग्णांवर यशस्वीरित्या किडनी रोपण केले आहे. डॉ. बावीकर यावेळी म्हणाले की, मी रामकृष्ण परहंस महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी आहे. या महाविद्यालयाने आम्हा सर्व विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार केले आणि म्हणूनच आम्ही या पदावर यशस्वीपणे काम करताना दिसतो आहे. ते पुढे म्हणाले की, आरोग्यदायी जीवन जगण्यासाठी दररोज व्यायाम आणि सकस आहार महत्त्वाचा आहे. आरोग्याला हानी पोहोचवेल असे कोणतेही व्यसन असू नये.
सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष धाराशिव शहरातील सुप्रसिद्ध डॉ. अभय शहापूरकर हे होते. अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना ते म्हणाले की, आरोग्य संबंधित कोणतीही समस्या असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेऊनच उपचार करावेत. विज्ञानावर विश्वास ठेवावा.
सर्वप्रथम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जयसिंगराव देशमुख यांनी या कार्यक्रमाचे प्रस्ताविक केले. प्रास्ताविकात प्राचार्य डॉ. देशमुख म्हणाले की, आज महाविद्यालयामध्ये किडनी विकार मार्गदर्शन शिबिर संपन्न होत आहे आणि यासाठी सर्व मार्गदर्शक हे रामकृष्ण परमहंस महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत याचा आम्हाला अभिमान आहे.
यावेळी डॉ.स्वप्नील यादव यांनी मधुमेह आणि रक्तदाब या आजाराविषयी मार्गदर्शन केले. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी व्यवस्थापन परिषद सदस्य श्री संजय निंबाळकर उपस्थित होते. त्यांनीदेखील आपल्या मनोगतातून रामकृष्ण परमहंस महाविद्यालया विषयी कृतज्ञता व्यक्त केली. याप्रसंगी सुधीर पाटील, श्याम जाधव यांनी आपली मनोगते व्यक्त केली. यावेळी सुप्रसिद्ध नेफ्रॉलॉजिस्ट आणि डॉ. सुहास बावीकर यांच्या कन्या डॉ. पूर्वा बावीकर उपस्थित होत्या.सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अरविंद हंगरगेकर यांनी केले तर आभार डॉ. दत्तात्रय साखरे यांनी मानले.सदर कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जयसिंगराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.