भूम (प्रतिनिधी)- मराठा आरक्षणाचा लढा तीव्र झाला आहे. शासन या लढ्याची दखल घेत नाही. या आरक्षणाच्या लढ्यासाठी मनोज जरांगे पाटील यांचा लढा चालूच आहे. मनोज जरांगे यांना पाठिंबा देण्यासाठी बार्शी येथील रवींद्र लोकरे रा.सुतार गल्ली बार्शी जि. सोलापूर यांनी बार्शी ते दिल्ली सायकल यात्रा चालू केली आहे. 

ते दिल्ली येथे जाऊन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेऊन सकल मराठा समाज बांधवाना आरक्षणाची गरज का आहे हे सांगणार आहेत. जर राष्ट्रपती यांनी भेट नाकारली तर ते एक दिवसाचे दिल्ली येथे लाक्षणिक उपोषण करणार आहेत. बुधवार दि. 13 रोजी पासून बार्शी येथून त्यांनी बार्शीचे ग्रामदैवत श्री. भगवतांचे दर्शन घेऊन या सायकल यात्रेची सुरुवात केली आहे. त्यांचा पहिला विसावा भूम येथे होता. भूम शहरात त्यांचे आगमन होताच सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने गोलाई चौक येथे त्यांचा सत्कार करून त्यांच्या विसाव्याची व जेवणाची सोय करण्यात आली. यावेळी प्रा. बिभीषण भैरट, अनिल शेंडगे, ॲड. विलास पवार, प्रा.अरुण गाढवे, विठ्ठल बाराते, प्रदीप गरड, मिनीनाथ नरके यांच्यासह सकल मराठा समाज बांधव हजर होते. यावेळी सकल मराठा समाज बांधवाच्या वतीने एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देण्यात आल्या. त्यांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना केली.


 
Top