धाराशिव (प्रतिनिधी)- घाणीच्या साम्राज्यामुळे पसरलेली दुर्गंधी, त्यावर मोकाट डुकरांचा वावर, तुंबलेल्या नाल्यामुळे रस्त्यावर येणारे पाणी अशा नागरी समस्यांनी त्रस्त समता नगरवासियांनी नगर परिषद कार्यालयात कचरा आणून फेकण्याचा इशारा देताच खडबडून जाग आलेल्या प्रशासनाने तत्काळ प्रभाग नऊमध्ये स्वच्छतेच्या कामास सुरुवात केली आहे. येथे कायमस्वरुपी घंटागाडीची व्यवस्था करण्यात आल्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. याबद्दल समता गृहनर्माण संस्था व नागरिकांच्या वतीने नगर परिषदेच्या मुख्याधिकारी तथा प्रशासक वसुधा फड यांचा सत्कार केला.
धाराशिव शहरातील समता नगरमध्ये दोन ते तीन आठवड्यांपासून घंटागाडी न फिरकल्यामुळे घरोघरी व दारासमोर कचऱ्याचे ढिग साचलेले होते. रस्ते व गटारींची स्वच्छता केली जात नसल्यामुळे सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरुन दुर्गंधीचा सामना नागरिकांना करावा लागत होता. परिणामी वृद्ध आणि बालके विविध आजाराने त्रस्त तर भूमिगत गटारीचे काम करताना रस्त्यावर मोठमोठे दगड आणि माती असल्यामुळे चालताना देखील मोठी कसरत करावी लागत होती. आठवड्यातून एकवेळेसच आणि तोही अपुरा पाणीपुरवठा होत असल्यामुळे नागरिकांना कृत्रिम पाणीटंचाईस सामोरे जावे लागत आहे. संपूर्ण प्रभाग नऊमध्ये हे चित्र असताना नगर नगर परिषद प्रशासन याकडे डोळेझाक करत होते. त्यामुळे वारंवार निवेदने देऊन विनंती करुनही कोणत्याही उपाययोजना केल्या जात नसल्यामभुळे 22 डिसेंंबर रोजी नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना पुन्हा निवेदन देऊन मागणीची दखल न घेतल्यास प्रभागातील सर्व कचरा नगर परिषदेत आणून टाकण्याचा निर्वाणीचा इशारा समता गृहनिर्माण संस्था व नागरिकांच्या वतीने देण्यात आला होता.
त्यानंतर नगर परिषदेने तातडीने पावले उचलत या भागातील कचरा उचलण्यासी गटारींची स्वच्छता करण्यास सुरुवात केली आहे. तसेच येथे कायमस्वरुपी घंटागाडीची व्यवस्था करण्यात येईल असे नागरिकांना आश्वासित केले. अखेर प्रभागातील गैरसोयी दूर होत असल्याबद्दल समता गृहनिर्माण संस्था व शहरवासियांच्या वतीने नपच्या मुख्याधिकारी वसुधा फड यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच नगर परिषद प्रशासन अधिकारी कार्यालयाचे श्री.जाधवर, नगर परिषदेचे विद्युत अभियंता, स्वच्छता विभाग प्रमुख के. बी. घडे यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. यावेळी समता सहकारी गृहनिर्माण संस्थेचे अध्यक्ष नाना घाटगे, संचालक आयुब शेख, सुरेश पुरी, शेषेराव टेकाळे, वासुदेव वेदपाठक, जे.आर.जगताप, हरिदास लोमटे, शिवसेना उपशहर प्रमुख बंडू आदरकर व इतर नागरिक उपस्थित होते.