धाराशिव (प्रतिनिधी) - आरोग्य मित्रांच्या विविध मागण्यासाठी धुळे जिल्ह्यातील आरोग्य मित्रांनी संप पुकारलेला आहे. त्या संपात धाराशिव जिल्ह्यातील आरोग्य मित्रांनी जाहीर पाठिंबा देत 25 हजार रुपये वेतन वाढ करण्यासह विविध मागण्या एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे दि.12 डिसेंबर रोजी केल्या आहेत.

दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, आरोग्य मित्र हे 2012 पासून आरोग्य मित्र म्हणून हे कार्यरत आहेत. तसेच एम.डी. इंडिया हेल्थ इन्शुरन्स प्रायव्हेट लिमिटेड यामध्ये महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या दोन्ही योजनांचा समावेश करण्यात आलेला आहे. मात्र या आरोग्य मित्रांना अगदी तुटपुंजे वेतन दिले जात आहे. सध्याची वाढती महागाईमध्ये त्यांचा उदरनिर्वाह करण्यासाठी ते वेतन अतिशय तोकडे ठरत आहे. त्यामुळे या आरोग्य मित्रांना प्रती महिना किमान 25 हजार रुपये वेतन वाढ देण्यात यावी. आरोग्य मित्र शासकीय सेवेमध्ये रुजू झाल्यापासून ते आजपर्यंतच्या वार्षिक इन्क्रिमेंटची रक्कम त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात यावी. कोविड -19 महामारीच्या काळामध्ये काम केलेला मोबदला देण्यात यावा. त्यांच्या कामाची वेळ 8 तासांची करण्यात यावी. तसेच ते आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेमध्ये आयुष्यमान कार्ड ई - केवायसीचे काम 2018 पासून विना मोबदला रात्रंदिवस व वेळेचा विचार न करता काम करीत आहेत. त्यामुळे आयुष्यमान कार्ड ई- केवायसीचा मोबदला देण्यात यावा. रुजू पत्रावर महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना असा उल्लेख करण्यात यावा आदी मागण्या केल्या आहेत. यावर फिरोज निरगुडे, रुक्सर पठाण, रोहन साळुंके, मारुती भारगंडे, प्रेमचंद वावळे, शहानवाज अत्तार, अमोल मुळे, अजय कदम, सागर पवार, अमृत लोमटे, संतोष दराडे, अमृता धत्तुरे, अतुल भोसले मेघराज देशमुख उमा कोल्हे बाबासाहेब भांगे नेताजी चव्हाण आदींच्या सह्या आहेत.


 
Top