नळदुर्ग (प्रतिनिधी)- नळदुर्ग येथील अलियाबद हिंदु स्मशानभुमीचे काम अर्धवटअवस्थेत ठेवणाऱ्या ठेकेदारावर नगरपालिका प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी अशी मागणी शहरवासियांनी केली आहे.

नळदुर्ग शहरात एकमेव अलियाबाद येथे हिंदु धर्मियांची स्मशानभुमी आहे. याठिकाणी जुनी स्मशानभुमी मोडकळीस आली असल्याने ती पाडुन त्याठिकाणी नगरपालिकेच्या वतीने लाखो रुपये खर्चूण नवीन स्मशानभुमीचे बांधकाम करण्यात आले आहे. नवीन स्मशानभुमी बांधण्याच्या कामावर नगरपालिकेचे लाखो रुपये खर्च झाले आहेत. मात्र ज्या ठेकेदाराने हे स्मशानभुमी बांधण्याचे काम घेतले आहे त्याने स्मशानभुमीचे काम अर्धवट अवस्थेत ठेऊन पलायन केले आहे. लाखो रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या स्मशानभुमीत आज प्रेत दहन करण्यासाठी जे लोखंडी सापळे बसविणे आवश्यक आहेत ते मात्र ठेकेदाराने याठिकाणी बसविले नाहीत. स्मशानभुमीचे बांधकाम होऊन अनेक महिने झाले आहेत. मात्र ठेकेदाराने स्मशानभुमीत प्रेत दहन करण्यासाठी जे लोखंडी सापळे बसविण्याची अंदाजपत्रकात तरतुद आहे ते अद्याप बसविले नाहीत. वास्तविक पाहता नगरपालिका प्रशासन किंवा नगर अभियंत्यांने याकडे लक्ष का दिले नाही याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. लाखो रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या या स्मशानभुमीत लोखंडी सापळे बसविण्यात आले नसल्याने याठिकाणी प्रेतावर अंत्यसंस्कार करण्यासाठी अडचणी येत आहेत.त्याचबरोबर या स्मशानभुमीत पाणी व लाईटचीही सोय नाही. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे या स्मशानभुमीत जाण्यासाठी व्यवस्थित रस्ताही नाही. अशी वाईट अवस्था नळदुर्ग शहरात असणाऱ्या एकमेव हिंदु स्मशानभुमीची आहे. नगरपालिका प्रशासनाने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. स्मशानभुमीचे काम अर्धवट अवस्थेत ठेवणाऱ्या ठेकेदारावर नगरपालिका प्रशासनाने तात्काळ कडक कारवाई करून याठिकाणी जे अर्धवट काम राहिले आहे ते पुर्ण करून घ्यावे अशी मागणी नागरीकांनी केली आहे.


 
Top