धाराशिव (प्रतिनिधी)-   पीएम प्रणाम संकल्पनेनुसार पुढील तीन वर्षांत 10 टक्के रासायनिक खतांचा वापर  कमी करून सेंद्रिय तसेच जैविक खतांचा वापर करण्यावर भर देण्यात येणार असल्याचे प्रतिपादन कृषी आयुक्तालय, पुणे  येथील तंत्र अधिकारी (खते) संदीप तांबे यांनी केले.  

विकसित भारत संकल्प यात्रा योजनेअंतर्गत पीएम प्रणामच्या माध्यमातून रासायनिक खतांचा संतुलित वापर करून जैविक खतांचा वापर करण्यास शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी धाराशिव येथील जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालयात शुक्रवारी (ता.15) बैठक घेण्यात आली. या वेळी ते बोलत होते. बैठकीस जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने, कृषी विकास अधिकारी प्रमोद राठोड, लातूर विभागाचे तंत्र अधिकारी (गुणनियंत्रण) प्रवीण भोर, जिल्हा परिषदेचे मोहीम अधिकारी दीपक गरगडे, जिल्हा गुणनियंत्रण निरीक्षक ज्ञानोबा रीतापुरे, कृषी विज्ञान तुळजापूर केंद्राच्या प्रमुख डॉ. वर्षा मारावळीकर यांच्यासह उपविभागीय कृषि अधिकारी धाराशिव जिल्हयातील सर्व तालुका कृषी अधिकारी,पंचायत समितीचे कृषी अधिकारी, खत उत्पादक कंपन्याचे प्रतिनिधी, खत विक्रते, प्रगतिशील शेतकरी आदी उपस्थित होते.

तांबे म्हणाले की, सध्या रासायनिक खंताचा मोठ्या प्रमाणत वापर होत आहे ,जमीनीच्या सुपिकता निर्देशांक आधारे रासायनिक खतांचा वापर करावा. तसेच रासायनिक खतावरील अवलंबित्व कमी करणेसाठी पर्यायी खते जसे जैविक खते,सेंद्रीय खते यांचा वापर वाढविण्यावर भर देण्यात यावा. यावेळी उपस्थित शेतकरी प्रतिनिधी यांनी नॅनो युरीया व नॅनो डिएपी वापराबाबतचे स्वत:चे अनुभव सांगितले. जमिनीचे आरोग्य टिकून ठेवण्यासह मानवाच्या आरोग्यासाठी पुढील तीन वर्षांत दहा टक्के रासायनिक खतांचा वापर कमी करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. चालू वर्षी दोन टक्के, पुढील वर्षी तीन टक्के तर त्यापुढील वर्षी पाच टक्के रासायनिक खतांचा वापर कमी करण्यावर भर देण्यात येणार असल्याचे तांबे म्हणाले.


 
Top