धाराशिव (प्रतिनिधी)-सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास, या ब्रीद वाक्याला धरून विकसित भारताचा संकल्प पूर्ण करायचा आहे. आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या लोककल्याणकारी योजना शेवटच्या घटकांपर्यंत पोहचवून त्यांच्या जीवनात आर्थिक समृद्धी आल्यानंतरच खऱ्या अर्थाने भारत विकसित झाला असे म्हणता येणार असून यासाठी प्रत्येकाने आपले योगदान देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी “विकसित भारत संकल्प यात्रा“ अभियानात इर्ला येथे बोलताना केले. याप्रसंगी त्यांच्या हस्ते गावातील रु 1 कोटी 98 लक्ष किमतीच्या कामांचे भूमीपूजन व लोकार्पण करण्यात आले.
यावेळी बोलताना ते म्हणाले की, विविध कौशल्य विकास योजनांच्या माध्यमातून केंद्र सरकार रोजगार निर्मितीवर भर देत असून युवकांना व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध दिले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या विश्वकर्मा योजनेचा बारा बलुतेदारांना मोठा फायदा होणार आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली देश वेगाने आर्थिक प्रगती करत आहे.
कौडगाव येथे सुमारे 10 हजार रोजगार निर्मितीची क्षमता असलेला टेक्निकल टेक्स्टाईल पार्क उभारण्यात येत आहे. आई तुळजाभवानीचे तीर्थक्षेत्र देखील तिरूपती देवस्थानाच्या धर्तीवर विकसित करण्यात येत आहे. तेर येथे गोरोबा काकांच्या मंदिराचा विकास आराखडा तयार केला असून, एक एक टप्पा आपण पुढे जात आहोत. तसेच पुरातत्व विभागाच्या माध्यमातून तेर मधील मंदिरे व पुरातन वास्तूंचे जतन व संवर्धनाचे काम हाती घेण्यात आले असून उत्खनन, म्युझियम आदी कामे लवकरच मार्गी लागणार आहेत. त्यामुळे देश विदेशातील पर्यटक देखील तेरला भेट देतील. त्यामुळे एकीकडे उद्योग तर दुसरीकडे पर्यटन क्षेत्राच्या माध्यमातून जिल्ह्यात रोजगार निर्मिती साठी प्रयत्न सुरू आहेत. गावातील विकास कामांसाठी देखील मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला जात असून गावातील प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न राहणार असून आपण देखील त्यासाठी पाठपुरावा करावा. प्रत्येक गावातून वीजे साठी ट्रांसफार्मरची मागणी वाढत आहे, त्यासाठी उर्जामंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत चर्चा केली असून, त्यांनी पुरेसे ट्रांसफार्मर उपलब्ध करून देण्याचे आश्वासित केले आहे. थोड्याच दिवसात कृषिसाठी वेगळी उपाय योजना करण्यात येत असून सौर उर्जेचा वापर मोठ्या प्रमाणावर करण्यात येणार असल्याची माहिती आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी उपस्थिती नागरिकांना दिली.
यावेळी भाजपा माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे, तालुकाध्यक्ष राजाभाऊ पाटील, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राजसिंह राजेनिंबाळकर, मा.जि. प. सदस्य उषाताई येरकळ, बाळासाहेब खांडेकर, सरपंच अण्णासाहेब पाटील, सोसायटी चेअरमन चांगदेव क्षीरसागर, ज्ञानेश्वर चौरे, भास्कर चौरे, बजरंग चौरे, भैरवनाथ खांडेकर, बाळासाहेब पाटील, बजरंग पाटील, संजय पाटील, रहीम शेख, रवींद्र कांबळे, हरून पटेल, गफार पटेल, बबन गजभार, उत्तरेश्वर सोलंकर, हमीद देशमुख, सुरजित राऊत, गोपाळ कदम, अँड. रमेश भोसले यांच्यासह कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.
