धाराशिव (प्रतिनिधी)-कायदे कितीही कठोर असले तरी लैंगिक अत्याचाराच्या घटनेमध्ये अजूनही प्रमाण कमी झालेली नाही. अगदी न कळत्या वयातील दोन, चार वर्षाच्या मुलीवर जेव्हा अमानुष अत्याचार केला जातो तेव्हा कोर्टामध्ये वकील म्हणून सुद्धा आम्ही सुन्न होतो. अशा अनेक केसेस आपल्या आसपास आणि परिसरात घडत असतात. त्यामुळे कायद्याच्या ज्ञानाबरोबरच  मुलींनाही सजग करणे अत्यंत गरजेचे आहे. असे प्रतिपादन विधीज्ञ अँड. तेजश्री पाटील यांनी केले.

येथील तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयात विशाखा समितीच्या वतीने  एआयसीटी आणि मिनिस्ट्री ऑफ वुमन अँड चाईल्ड डेव्हलपमेंट तसेच मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन यांच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार लैंगिक अत्याचारा विरुद्ध प्रतिकार या विषयावर ठेवलेल्या कार्यशाळेत अँड.तेजश्री पाटील बोलत होत्या.

 यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विक्रमसिंह माने यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यशाळेसाठी विशाखा समितीच्या अध्यक्षा प्रा.सुनीता गुंजाळ-कवडे, बेसिक सायन्स अँड हुमानिटी विभाग प्रमुख डॉ. उषा वडणे, प्रा. सुजाता गायकवाड यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. 

यावेळी अँड. तेजश्री पाटील यांनी लैंगिक अत्याचारा विरोधी असलेल्या कायद्याची ओळख उपस्थित मुलींना करून दिली.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विक्रमसिंह माने यावेळी बोलताना म्हणाले की मुलींनी शिक्षणाबरोबरच स्वसंरक्षणाचे धडे घेणे हे गरजेचे असून त्यादृष्टीने सजग असले पाहिजे. यावेळी बोलताना विशाखा समितीच्या अध्यक्षा आणि कार्यक्रम समन्वयक प्रा. सुनिता गुंजाळ म्हणाल्या की सामाजिक माध्यमामुळे प्रत्येक गोष्टीची माहिती सहज उपलब्ध झाली असून त्या दृष्टीने उत्सुकता ही लवकर निर्माण होते. योग्य वयात प्रेम जरूर करावे, पण त्यातील धोके ओळखता आले पाहिजेत. निरागस प्रेम आणि वासनांध प्रेम यातील फरक मुलींना ओळखता आला पाहिजे.

डॉ.उषा वडणे यावेळी बोलताना म्हणाल्या की, प्रत्येक गोष्टीमध्ये मुलांन इतक्याच मुलीही जबाबदार असतात. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याने आत्मभान जागृत ठेवून अगोदर करिअरची निवड नक्की करून त्यादृष्टीने वाटचाल केली पाहिजे. यावेळी प्रा. वंदना मैंदर्गी ,प्रा.राधा रणदिवे,प्रा. अमृता पिंपळे यांनीही उपस्थित विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऐश्वर्या सक्राते हिने केले. तर हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सविता नलावडे, सुक्षमा टेकाळे, अंकिता शिंदे यांनी विशेष सहकार्य केले.


 
Top