धाराशिव (प्रतिनिधी)- भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रशेखर बावनकुळे यांच्या धाराशिव जिल्हा दौऱ्याची जय्यत तयारी करण्यात आल्याची माहिती पक्षाचे जिल्हाध्यक्ष संताजीराजे चालुक्य - पाटील यांनी प्रसार माध्यमांना दिली. चार राज्यातील विधानसभा निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळाल्याबद्दल प्रदेशाध्यक्ष श्री बावनकुळे यांचा जंगी सत्कार करण्यात येणार असल्याचेही चालुक्य यांनी सांगितले.
भाजपा जिल्हाध्यक्ष चालुक्य यांनी दिलेली माहिती अशी, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे हे बुधवार, दि. 6 डिसेंबर 2024 रोजी धाराशिव जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. प्रदेशाध्यक्ष बावनकुळे धाराशिव लोकसभा मतदार संघ व सहा विधानसभा मतदारसंघातील पक्ष संघटन अधिक बळकट करण्याच्या मोहिमेच्या अनुषंगाने येत आहेत. लोकसभा कोअर कमिटी बैठकीस श्री बावनकुळे मार्गदर्शन करणार आहेत. त्यानंतर दुपारी सुपर वॉरिअर्स यांच्याशी श्री बावनकुळे संवाद साधणार आहेत. मंडळ, बूथ प्रमुख नियुक्तीचा आढावा घेणार आहेत. प्रदेशाध्यक्ष श्री बावनकुळे यांच्या या महत्वपूर्ण दौऱ्याच्या पार्श्वभूमिवर धाराशिव लोकसभा मतदारसंघात तयारी करण्यात आली आहे. लोकसभा मतदारसंघातील धाराशिव, तुळजापूर, परंडा,उमरगा (जिल्हा धाराशिव), औसा ( जिल्हा लातूर)व बार्शी (सोलापूर ) या 6 विधानसभा मतदारसंघ निहाय पक्षाचे पदाधिकारी व वॉरिअर्स यांच्या बैठका घेण्यात आल्या आहेत. या पूर्वतयारी बैठकीस आ. राणाजगजितसिंह पाटील, आ. अभिमन्यू पवार, आ. राजेंद्र राऊत, माजी आ. सुजितसिंह ठाकूर, जिल्हाध्यक्ष संताजीराजे चालुक्य - पाटील आदींनी मार्गदर्शन केले. मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड या 3 प्रमुख राज्यातील विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने घवघवीत यश संपादन केले. भाजपाने 3 प्रमुख राज्यात सत्ता संपादन केल्याबद्दल भाजपाचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांचा धाराशिव जिल्हा भाजपाच्या वतीने जंगी सत्कार करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाध्यक्ष चालुक्य पाटील यांनी दिली.