धाराशिव (प्रतिनिधी)-सोलापूर-तुळजापूर-धाराशिव रेल्वेमार्गाच्या पहिल्या टप्प्यातील धाराशिव-तुळजापूर या 30 किलोमीटर लांबीच्या ब्रॉडगेज रेल्वेमार्गासाठी 544 कोटी रूपयांच्या कामाची निविदा प्रक्रिया सुरु असून लवकरात लवकर निविदा अंतिम करण्याच्या सूचना आ.राणाजगजितसिंह पाटील यांनी रेल्वेचे मुख्य अभियंता श्री. दिनेश कटारिया यांना दिल्या आहेत व जानेवारीत रेल्वे मार्गाचे काम प्रत्यक्ष सुरु करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

पहिल्या टप्प्यातील या कामासाठी 10 ऑगस्ट रोजी सोलापूर विभागांतर्गत नवीन ब्रॉडगेज लाईन अंथरण्यासाठी निविदा मागविण्यात आल्या होत्या. 30 किलोमीटरच्या या कामासाठी 544 कोटी रूपयांची निविदा प्रकाशित करण्यात आली आहे. 10 ऑक्टोबर पर्यंत निविदा स्वीकारण्याची तारीख होती. यामध्ये 16 कंत्राटदारांनी सहभाग नोंदविला असून या निविदांची छाननी करण्यासाठी आरआयटीएस या एजन्सीची नियुक्ती करण्यात आली आहे. भरलेल्या निवीदांच्या छाननीचे काम सुरु असून याला गती देत निविदा अंतिम करून प्रत्यक्षात जानेवारी महिन्यात काम सुरु करण्यासाठी आ. राणाजगजितसिंह पाटील साहेब आग्रही असून तशा सूचना रेल्वे विभागाच्या मुख्य अभियंत्यांना दिल्या आहेत.

30 महिन्यांच्या आत हा रेल्वेमार्ग पूर्ण करण्याचे उद्दिष्ट निर्धारित करण्यात आले आहे. या मार्गावर सांजा, वडगाव आणि तुळजापूर, असे तीन नवीन रेल्वे स्थानक उभारले जाणार आहेत. ठाकरे सरकारच्या अनास्थे मुळे रखडलेल्या या रेल्वे मार्गाचे काम लवकर पुर्ण करण्यासाठी कामाचे तीन टप्पे करण्यात आले असून धाराशिव जिल्ह्यातील कामाचे दोन स्वतंत्र टप्पे करण्यात आले आहेत. एकूण 84 कि.मी लांबीच्या या रेल्वेमार्गावर 110 पूल आणि तीन मोठे उड्डाणपूल असणार आहेत.

महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर या रेल्वेमार्गासाठी 452.46 कोटी रूपयांच्या निधीला तात्काळ मंजुरी देण्यात आली होती, व या नंतरच या कामाला वेग आला असून अडीच वर्षात हा प्रकल्प पूर्ण करण्याचा निर्धार आहे.


 
Top