धाराशिव (प्रतिनिधी)-गुन्हेगारी रोखण्यासह विविध सामाजिक उपक्रम राबवून पोलीस आणि नागरिकांमध्ये समन्वय राखण्याचे काम धाराशिव जिल्हा पोलीस दलाच्या वतीने केले जात असल्याबाबत अपर पोलिस महासंचालक कृष्ण प्रकाश यांनी समाधान व्यक्त केले. त्याचबरोबर आदिवासी पारधींचे पुनर्वसन, वृक्ष लागवड, शेतकऱ्यांसाठी सेंद्रिय शेती उत्पादनाचा बाजार, कम्युनिटी पोलिसींग यासारखे उपक्रम राबवित असल्याबद्दल पोलीस अधीक्षक कुलकर्णी यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली.

अपर पोलिस महासंचालक,मुंबई  कृष्ण प्रकाश यांनी दोन दिवस धाराशिव जिल्हा पोलीस दलाच्या कामकाजाची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी जिल्हा पोलीस मुख्यालयाच्या परेड मैदानावर पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक गौहर हसन उपस्थित होते. यावेळी अपर पोलिस महसंचालक कृष्ण प्रकाश म्हणाले की, धाराशिव जिल्हा हा विविध वैशिष्टयांनी परिपूर्ण आहे. येथील पोलीस दलामार्फत सतत विविध उपक्रम राबविले जातात, ही कौतुकाची बाब आहे. पोलिसाचे काम हे गुन्हेगारी रोखण्यापासून परावृत्त करुन त्यांना समाजात पुन्हा सन्मानाने जगण्याची संधी उपलब्ध करुन देण्याचेही आहे. हे जिल्हा पोलीस अधीक्षक .कुलकर्णी यांनी दाखवून दिले आहे. त्याचबरोबर पर्यावरण संवर्धनासाठीही पुढाकार घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक कुलकर्णी यांनी पदभार स्वीकारल्यापासून दहा लाख वृक्षांची लागवड केली आहे. तसेच कम्युनिटी पोलिसींगच्या माध्यमातून नागरिकांमध्ये समन्वय राखणे यासारखे उपक्रम राज्यासाठी पथदर्शक असल्याचे सांगून जिल्हा पोलीस दलाच्या कामकाजाबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले.


 
Top