धाराशिव (प्रतिनिधी)- मराठवाड्यातील मराठा समाजाची परिस्थिती बिकट आहे. बहुतांश मराठा समाज आर्थिक अडचणीत आहे. शासकीय सेवेत व शिक्षणामध्ये मराठा समाजाला आरक्षणाची नितांत गरज आहे. मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी शब्द दिल्यामुळे मराठा समाजाला न्यायालयात टिकणारे, कायद्याच्या चौकटीत बसणारे आरक्षण मिळेल. तसेच आरक्षण मागणाऱ्या इतर समाजालाही ते न्याय देतील असा विश्वास व्यक्त केला. महायुती सरकारकडून मराठा आरक्षणाबाबत सुरू असलेल्या सकारात्मक उपाययोजनांची माहिती सर्व मराठा समाजबांधवांना वेळोवेळी कळावायला हवी अशी आग्रही मागणी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी विधानसभेत केली.
मराठा आरक्षणाबाबत आमदार आशिष शेलार यांच्यासह सत्ताधारी आमदारांनी मांडलेल्या ठरावावर आमदार राणाजगजितसिंह पाटील सभागृहात बोलत होते. सभागृहाचे नेते तथा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आरक्षणाबाबत स्पष्ट शब्द दिला आहे. मराठा समाजासह आरक्षण मागणाऱ्या अन्य समाजालाही न्याय देण्याची मुख्यमंत्री महोदयांची भूमिका आहे. त्यावर आपला संपूर्ण विश्वास असल्याची भावनाही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली. अंतरवली सराटी आणि बीड येथे झालेल्या अप्रिय घटनांचीही सखोल चौकशी व्हायला हवी. त्यातील वस्तुस्थिती सर्वांसमोर यायला हवी असल्याचेही आमदार पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले.
