भूम (प्रतिनिधी)-बीड जिल्ह्यातील धारूर येथे शासन आपल्या दारी हा कार्यक्रम असल्याने या कार्यक्रमासाठी लोकांना आणण्यासाठी भूम आगारातून सोमवारी दुपारी 15 बसेस रवाना झाल्या आहेत. विशेष म्हणजे भूम बसस्थानकावर विद्यार्थ्यांसह प्रवाशांची मोठी गर्दी असताना ही कोणतेही नियोजन न करता या बसेस पाठविल्या आहेत. यासंदर्भात भूम आगार प्रमुखास संपर्क साधला असता त्यांचा फोंन सतत व्यस्त लागत होतो. 

याबाबत अधिक माहिती अशी की, जिल्ह्यात मध्यवर्ती बसस्थानक म्हणून भूम बसस्थानकाचा समावेश आहे. भूम बसस्थानकावर अहमदनगर, बीड, सोलापूर, धाराशिव आदी जिल्ह्यातील प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. विशेष म्हणजे भूम परिसरातील ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी याच एसटी महामंडळाच्या बसेसने गावाकडून येतात व जातात. त्यामुळे 4 डिसेंबर रोजी अचानक बसेस बंद झाल्याने शालेय विद्यार्थी रडकुंडीला आले. अखेर याची माहिती जबाबदार लोकांना मिळाल्यानंतर त्यांनी खाजगी गाड्यातून विद्यार्थ्यांना आपापल्या गावी पाठविले. 


मनमानी कारभार

एस. टी. महामंडळाचे मनमानी कारभार होत असल्याचे सध्या दिसून येत आहे. भूम, वाशी, परंडा परिसरातील लोकांसाठी भूम निवासी डॉ. घुले यांनी डहाणू येथे आपल्या सुसज्ज हॉस्पिटलमध्ये मोफत आरोग्य सेवा चालू केली आहे. आपल्या भागातील लोकांचे काही तरी देणे लागतो, या भावनेतून त्यांनी ही सेवा चालू केली आहे. या सेवेचा लाभ घेण्यासाठी भूम ते डहाणू ही बससेवाही चालू करण्यात आली होती. या बसचे उत्पन्न चांगले असताना आणि 18 डिसेंबरपर्यंत बुकींग केली असतानाही ही बस कोणतीही पूर्व कल्पना न देता राजकीय द्वेष भावनेतून 29 नोव्हेंबरला बंद केली. त्यामुळे अनेक लोकांचे आरोग्य सेवे अभावी हाल झाले. 


दिवाळीसाठी खास बस

या संदर्भात एस. टी. महामंडळाच्या विभागीय वाहतूक अधिकारी हर्ष बनसोडे यांना विचारण्यात आले असता त्यांनी भूम ते डहाणू ही बस दिवाळी सुट्टीपुर्ती मर्यादित होती असे सांगून बसचे उत्पन्न व प्रवाशांच्या प्रतिसाद उत्तम होता. त्यामुळे या भूम ते डहाणू बस परत चालू करण्यासाठी अधिकृत प्रस्ताव मुंबई ऑफिसला पाठविला आहे. त्यानंतर परत ही बससेवा सुरू करण्यात येईल असे सांगितले. 


 
Top