धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव ग्रामीण पोलिस ठाण्याने गुप्त माहितीच्या अधारे तालुक्यातील अंबेजवळगे शिवारात अवैध गुटख्याची वाहतुक करीत असलेल्या इनोव्हा कार व अवैध गुटखा यासह 8 लाख 84 हजार रूपये किंमतीचा माल जप्त करून एका आरोपील ताब्यात घेतले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्याचे पथक हे पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करत असताना पथकास गुप्त बातमी मिळाली की, एक सिलव्हर रंगाची इनोव्हा कार ही अंबेजवळगे शिवारातुन अवैध गुटखा वाहतुक करीत आहे. त्यावर पथकाने लागलीच तेथे जावून समोरुन येणारे सिलव्हर रंगाची इनोव्हा वाहन क्र एम.एच. 14 व्ही 1642 हे पेट्रोलिंग दरम्यान थांबवून चेक केले. त्यात महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत केलेला गोवा गुटखा मिळून आला. पथकाने सदर इनोव्हा व त्यातील मिळून आलेला रजनीवास सुगंधीत पान मसाला किमंत अंदाजे 3 लाख 7 हजार 200 रूपये, प्रिमीयम झेड एल 1 जाफराणी जर्दा किंमत अंदाजे 76 हजार 800 रूपये एकुण 3 लाख 84 हजार रूपये किंमतीच्या मालासह वाहन क्र एम.एच. 14 व्ही 1642 सिलव्हर रंगाची इनोव्हा असा एकुण 8 लाख 84 हजार रूपये किंमतीचा माल मिळून आला. माल जप्त करुन मिळून आलेला माल व आरोपी निहाल माजिद काझी, वय 21 वर्षे, रा. खाजानगर गल्ली नं 22 धाराशिव ता. जि. धाराशिव यास ताब्यात घेवून आरोपी याचे विरुध्द पोलीस ठाणे धाराशिव ग्रामीण येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस निरीक्षक गायकवाड करत आहे.
सदर कामगिरी ही पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी,अपर पोलीस अधीक्षक गौहर हसन यांचे मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्नील राठोड, धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक गायकवाड, पोलीस ठाणे धाराशिव ग्रामीण यांच्या पथकाने केली आहे.
