धाराशिव (प्रतिनिधी)- भारतमाता ज्ञानपीठातर्फे 42 वे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन. 24 डिसेंबर 2023 रोजी सांगली जिल्ह्यातील विटा येथे होत आहे. या संमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ साहित्यिक व संत साहित्याचे अभ्यासक डॉ. मुरहरी केळे यांच्या हस्ते होणार असल्याचे संयोजक रघुराज मेटकरी यांनी कळविले आहे.
सदर संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक प्रा.रंगनाथ पठारे असून स्वागताध्यक्ष डॉ.विठ्ठल शिवणकर आहेत. उद्घाटन समारंभास पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.प्रकाश महानवर, सहायक संचालक (तंत्रशिक्षण) कुंडलिक एडके प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. संमेलनात कविसंमेलन, कथाकथनासह विविध कार्यक्रम होणार असून, सर्व साहित्यप्रेमींनी त्या संमेलनाला उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे.
संमेलनाचे उद्धाटक डॉ.केळे हे मूळचे केळेवाडी (जि.धाराशिव) येथील रहिवासी असून, गेल्या तीस वर्षांपासून ते साहित्य लेखन करत आहेत. त्यांनी लिहिलेले ‘जगी ऐसा बाप व्हावा' हे वडिलांचे चरित्र व ‘नानी' हे आईचे चरित्र प्रसिद्ध आहे. यासह त्यांची विविध विषयांवरील दहाहून अधिक पुस्तके मराठी व इंग्रजी भाषेत प्रकाशित झालेली असून, अनेक दिवाळी अंक, मासिके, वृत्तपत्रांतही त्यांनी विपुल लेखन केलेले आहे.महावितरणच्या छत्रपती संभाजीनगर परिमंडलाचे मुख्य अभियंता म्हणून कार्यरत आहेत. साहित्यिक, सामाजिक व प्रशासकीय क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल शासनासह विविध संस्थांच्या वतीने 33 हून अधिक पुरस्कारांनी त्यांचा गौरव करण्यात आलेला आहे.अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या वतीने नागपूर येथे नुकत्याच झालेल्या 30 व्या अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद डॉ.केळे यांनी भूषवलेले आहे.
