धाराशिव (प्रतिनिधी) - धनगर समाजाच्या आरक्षणासंदर्भात न्यायप्रविष्ट असलेल्या याचिकेत धनगर समाजाची बाजू प्रभावीपणे मांडण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने सरकारी वकीलांसह जेष्ठ विधिज्ञ उपलब्ध करून दिला जाणार आहे. त्याचबरोबर तुळजापूर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या भव्य स्मारकासाठी 1 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे मंत्री अतुलजी सावे यांच्या सोबत नागपूर येथे झालेल्या बैठकीत तसा निर्णय झाला असल्याची माहिती आ.राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.
धनगर आरक्षण व समाजाचे इतर प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी बैठक घेण्यासाठी आ.राणा जगजितसिंह पाटील यांनी इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे मंत्री अतुलजी सावे यांच्याकडे मागनी केली होती. त्याअनुषंगाने आज नागपूर येथे विधान भवनात त्यांनी संबंधित विभागाचे अधिकारी यांच्यासोबत बैठक घेतली आहे. या बैठकीत भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे,धनगर समाजाचे नेते बाळासाहेब खांडेकर अरविंद पाटील,राम जवान व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
सदर बैठकीत धनगर समाजाला आरक्षणच देण्याचा प्रश्न हा न्यायप्रविष्ट असल्याने यात समाजाची बाजू भक्कमपणे मांडण्यासाठी राज्य सरकारच्यावतीने सरकारी वकील व त्यांच्या जोडीला नामांकित जेष्ठ विधीज्ञ देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती आ.पाटील यांनी दिली आहे.तुळजापूर येथे देशविदेशातील भाविक मोठ्या संख्येने आई तुळजाभवानी च्या दर्शनासाठी येत असतात.तुळजापूर येथे जर पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांचे पूर्णाकृती पुतळा असलेले भव्य असे स्मारक उभे केले तर त्याच्या माध्यमातून देशविदेशातील नागरिकांना अहिल्यादेवींचा इतिहास माहिती होईल त्यामुळे तुळजापूर येथे स्मारक उभारण्याबाबत देखील चर्चा झाली.
