भूम (प्रतिनिधी)-आई-वडिलांचा अपघात झाला. वडील नीट झाले. आई मात्र गेल्या 20 वर्षापासून आजही कोमात आहे. दरम्यानच्या काळात मुलगा डॉक्टर झाला. पालघर जिल्ह्यातील डहाणू येथे सुसज्ज हॉस्पिटल टाकले. परंतु आपली मातृभूमी असलेल्या भूम, परंडा, वाशी येथून आलेल्या अनेक रूग्णांचे डॉ. राहुल घुले यांनी मोफत ऑपरेशन सुरू केले आहे. आपल्या परिसरातील गरंजुवंत रूग्णांना सरळ डहाणूला येण्यासाठी भूम ते डहाणू ही बससेवाही त्यांनी सुरू करण्यासाठी प्रयत्न केले.

20 वर्षापूर्वी शिक्षक असणारे घुले यांचा मोटरसायलकवर जात असताना अपघात झाला. या अपघातामध्ये सौ. घुले या गंभीर जखमी झाल्या. तर घुले गुरूजी बरे झाले. ऑपरेशन झाल्यानंतर योग्य वेळी आरोग्य सेवा न मिळाल्यामुळे डॉ. राहुल यांची आई आजही कोमातच आहे. डॉ. राहुल घुले यांनी आपल्या परिसरातील लोकांना योग्य वेळी आरोग्य सेवा मिळावी म्हणून मोफत ऑपरेशन गेल्या काही वर्षापासून त्यांनी चालू केले आहे. ऑपरेशनसाठी लोकांना येता यावे यासाठी त्यांनी भूम ते डहाणू अशी सरळ बससेवा चालू करण्यासाठी प्रयत्न केले. भूम मधून दररोज सकाळी निघणाऱ्या बसचा शुभारंभ पोलिस निरीक्षक प्रल्हाद सुर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी आगारप्रमुख महेश लांडगे व महामंडळाचे कर्मचारी उपस्थित होते. 


 
Top