धाराशिव (प्रतिनिधी)-धाराशिव तालुक्यातील बावी पाटी - खामसवाडी - केशेगाव - शिंदेवाडी - उमरेगव्हाण रस्त्यावर बाबासाहेब आंबेडकर साखर कारखाना असल्यामुळे सदरील रस्त्यावर अवजड वाहतूक मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे सदरील रस्त्याची अवस्था खूप प्रमाणात नुकसान होते. म्हणून या रस्त्याचे सिमेंट काँक्रीटीकरण करण्यात यावे, अशी मागणी अखिल भारतीय छावा वाहतूक आघाडीच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपकार्यकारी अभियंता यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
सदर रस्त्याच्या प्रश्नावर या भागातील रहिवासी, नागरिकानी तसेच संबंधित गावच्या ग्रामपंचायत कार्यालयामार्फत बांधकाम विभागाकडे वेळोवेळी पाठपुरावा केल्यानंतर रस्त्याची तात्पुरती थातूरमातूर मलमपट्टी केली जाते. त्याचा काही उपयोग होत नाही. वेळोवेळी बांधकाम विभाग तात्पुरती मलमपट्टी करून शासनाचा पैसावाया घालवत आहे. त्यामुळे सदरील रस्ता कायमस्वरूपी मजबुत करण्यात यावा म्हणून सिमेंट काँक्रिट रस्ता करावा अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
यावेळी वाहतूक आघाडीचे धाराशिव अध्यक्ष शिवहरी भोसले, शेतकरी आघाडीचे तालुकाध्यक्ष चेतनराव गुळवे, छावा संघटनेचे सचिव ज्योतीराम काळे, सोशल मीडिया धाराशिव अध्यक्ष नानासाहेब गुंड, विद्यार्थी आघाडीचे समर्थ लाड, रामेश्वर हराळे, तसेच छावा संघटनेचे पदाधिकारी, तसेच परिसरातील नागरिक उपस्थित होते.