धाराशिव (प्रतिनिधी) - तालुक्यातील येडशी येथील एकाचा खून करण्यात आला होता. या प्रकरणात केवळ द्वेष भावनेने खोटा आरोप करून चार आरोपींच्या विरोधात खून केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र अमोल वरुडकर यांनी केलेला युक्तिवाद व न्यायालयासमोर आलेला पुरावे ग्राह्य धरुन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाच्या न्यायमूर्ती अंजू शेंडे यांनी चार आरोपींची निर्दोष मुक्तता दि.25 नोव्हेंबर रोजी केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, धाराशिव तालुक्यातील येडशी येथील आनंद पताळे यांचा 2018 साली त्यांचा धारदार शस्त्राने खून करण्यात येऊन त्यांचा मृतदेह तेथीलच अभय अरण्यात फेकून देण्यात आला होता. या प्रकरणी धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात गु. र. नं. 85/2018 कलम 302, 201, 354 डी, 34 भादवि नुसार गुन्हा नोंदविण्यात आला होता. पताळे यांच्या पत्नीशी येडशी येथीलच या चार आरोपींपैकी अमोल ओव्हाळ यास अनैतिक संबंध निर्माण करायवाचे होते. त्या संबंधांस पती आनंद पताळे यांचा अडथळा येत होता. त्यामुळे आनंद ओव्हाळ यांच्यासह इतर तिघांनी संगणमताने पताळे यांचा खून केला असल्याचा खोटा व द्वेष भावनेने आरोप करून या चार आरोपी विरोधात खोटा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा पोलिसांनी तपास करून दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले. या प्रकरणी न्यायालयामध्ये 7 आरोपींची साक्ष घेण्यात आली. मात्र ॲड अमोल वरुडकर यांनी विविध मुद्यांवरकेलेला युक्तिवाद व साक्षीदारांची घेतलेली उलट तपासणी तसेच न्यायालयासमोर आलेल्या सबळ पुराव्या अभावी प्रमुख सत्र व जिल्हा न्यायाधीश अंजू शेंडे यांनी अमोल ओव्हाळ यांच्यासह इतर तीन आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. या प्रकरणात आरोपींच्यावतीने ॲड. वरुडकर यांना ॲड. भाग्यश्री कदम, ॲड. वैभव खांडेकर, ॲड. संजय व्हटकर, ॲड. प्रवीण पाटील, ॲड. जनक साळुंखे, ॲड. रजनीकांत ढेकणे, ॲड. बालाजी पोतदार व ॲड. सचिन जाधव यांनी सहकार्य केले.