धाराशिव (प्रतिनिधी)-दुष्काळ सदृष्य परिस्थितीत उर्वरीत 11 मंडळाचा समावेश करुन जिल्हयातील सर्व मंडळांतील शेतकऱ्यांना एनडीआरएफ व एसडीआरएफ च्या निकषाप्रमाणे तात्काळ मदत करण्यात यावी असे आ पाटील यांनी सांगितले .
धाराशिव जिल्हयामध्ये 2023 मध्ये सरासरी पेक्षा कमी पर्जन्यमान झाले असुन शेतकऱ्यांच्या उत्पन्नात मोठया प्रमाणात घट झालेली असल्याने शासनाने जिल्हयातील धाराशिव, वाशी, व लोहारा तालुक्यामध्ये दुष्काळ जाहिर केलेला असुन 57 महसुल मंडळापैकी 46 मंडळात दुष्काळ वा दुष्काळ सदृष्य परिस्थिती घोषित केलेली आहे.
जिल्हयातील 27 मंडळे हे दुष्काळ सदृष्य परिस्थतीच्या कक्षेत घेतलेली आहेत परंतु कळंब तालुक्यातील- मस्सा (खं) व नायगाव, तुळजापुर तालुक्यातील- तामलवाडी, आरळी बु. व जळकोट, उमरगा तालुक्यातील-बलसुर, बेडगा, भुम तालुक्यातील- पाथ्रुड, आष्टा, परंडा तालुक्यातील शेळगाव, पाचपिंपळा अशा 11 मंडळामध्ये दुष्काळ सदृष्य परिस्थिती घोषित केलेली नसुन या मंडळातही पावसाचे सरासरीचे प्रमाण अत्यल्प असल्याने दुष्काळ सदृष्य परिस्थिती घोषित करुन फक्त घोषणा न करता जिल्हयातील सर्व मंडळामध्ये राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन व राज्य आपत्ती व्यवस्थापन च्या निकषाप्रमाणे सर्व शेतकऱ्यांना ठोस व तात्काळ भरीव आर्थिक मदत करण्यात यावी असे आमदार पाटील यांनी सांगितले.
धाराशिव जिल्हयातील दुष्काळ सदृष्य परिस्थितीमधुन वगळलेल्या 11 मंडळाचा जिल्हाधिकारी, धाराशिव यांच्याकडुन अहवाल मागवुन घेऊन या सर्व मंडळांत दुष्काळ सदृष्य परिस्थती घोषित करुन जिल्हयातील सर्व मंडळांतील शेतकऱ्यांना राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन व राज्य आपत्ती व्यवस्थापन च्या निकषाप्रमाणे तात्काळ ठोस व भरीव आर्थिक मदत करावी असे आमदार कैलास पाटील यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्र्याकडे मागणी केल्याचे सांगितले.