धाराशिव (प्रतिनिधी) अभंगाचा शहारे आणणारा ठेका, भावगीताची तरल जादू, भक्तीगीतांच्या स्वरात नाहून गेलेले सभागृह आणि लावणीच्या ठेक्यावर धरलेला ताल असा अनोखा स्वर अनुभव धाराशिवकरांनी सोमवारी पहाटे अनुभवला. येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात तुलसी सामाजिक संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या दिवाळी स्वरमय पहाट कार्यक्रमाला शहरवासीयांनी उदंड प्रतिसाद दिला.

सोमवारी पहाटे सहा वाजता छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात तुलसी सामाजिक संस्थेच्या वतीने पहिल्यांदाच दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तुळजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते तुळजाभवानी देवीच्या प्रतिमेचे पूजन आणि दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर पुढील तीन तास सभागृहातील श्रोते वेगवेगळ्या स्वरांच्या बरसातीमध्ये अक्षरशः चिंब झाले. कोणता झेंडा घेऊ हाती फेम ज्ञानेश्वर मेश्राम माऊली, 'झी सा रे ग म प'च्या मंचावरून महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेला लाडका गायक अनिकेत सराफ आणि सुर नवा ध्यास नवा पर्वाच्या महाविजेत्या सम्मिता धापटे-शिंदे यांनी यांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध करून सोडले. अनिकेत सराफ यांनी सादर केलेल्या गझल, सन्मिता धापटे यांची लावणी आणि ज्ञानेश्वर मेश्राम यांनी सादर केलेले अभंग आणि भक्ती गीतांना सभागृहातील रसिक श्रोत्यांनी उसळून दाद दिली.

प्रारंभी कार्यक्रमाचे आयोजक तथा तुलसी सामाजिक संस्थेचे अध्यक्ष नितीन काळे यांनी कार्यक्रमाच्या आयोजनामागची भूमिका प्रास्ताविकपर मनोगतातून व्यक्त केली. दरवर्षी अशा पद्धतीचा भव्य दिव्य कार्यक्रम आयोजित करणार असल्याचा संकल्पही त्यांनी यावेळी जाहीर केला. आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी उपस्थितांना दीपावलीच्या शुभेच्छा देऊन सर्वच टप्प्यांवरती धाराशिव जिल्हा रूप बदलत असल्याचे सांगितले. या नव्या विकासात्मक प्रक्रियेचे आपण सगळेजण साक्षीदार असल्याचे सांगून त्यांनी कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. यावेळी जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्ष सौ. अर्चनाताई राणाजगजीतसिंह पाटील, कार्यक्रमाचे सहसंयोजक असलेले निमा संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर गोविंद पाखले लघुउद्योग भारतीचे अध्यक्ष निशांत होनमोटे, संस्कार भारतीचे शाम भन्साळी आणि शेषनाथ वाघ यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कवी रवींद्र केसकर यांनी तर आभार नितीन काळे यांनी मानले. कार्यक्रमास शहर व परिसरातील रसिक श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top