धाराशिव (प्रतिनिधी) - जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी उसाचा भाव निश्चित करून साखर कारखाने सुरु करावेत. तसेच कारखान्यावरील वजन काटे तपासणीबाबत साखर आयुक्तांनी दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी भरारी पथकाची स्थापना करण्यात यावी व दोषी असणाऱ्या संबंधित कारखान्याऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने जिल्हाध्यक्ष रवींद्र इंगळे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांकडे एका निवेदनाद्वारे दि.21 नोव्हेंबर रोजी केली आहे.
दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, महाराष्ट्र राज्याच्या साखर आयुक्तांनी दि. 25 ऑक्टोबर रोजी साखर कारखान्यांचे वजनकाटे संदर्भात दिलेल्या आदेशाप्रमाणे तात्काळ कार्यवाही करण्यात यावी. तसेच चालू गळीत हंगामासाठी धाराशिव जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी प्रथम उसाचा भाव निश्चित करावा व नंतरच साखर कारखाने चालु करावेत. तर साखर आयुक्तांनी दिलेल्या आदेशांची. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांना वजन मापे बसविण्यासाठी व साखर आयुक्तांच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी आपल्या माध्यमातून योग्यती कार्यवाही करण्याची मागणी केली आहे. विशेष म्हणजे मागील वर्षी जिल्हाभरातील साखर वजनकाटा नसलेल्या कारखाना व संबंधित यंत्रणेची चौकशी करून त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करावी. तसेच या विषयाच्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील शेतकरी, शेतकरी संघटना व कारखानदार यांची संयुक्त बैठक घ्यावी अशी मागणी केली आहे. यावर जिल्हाध्यक्ष रवींद्र इंगळे, स्वाभिमानी पक्षाचे अध्यक्ष तानाजी पाटील, सुरेश कोकरे, वैभव मोटे, महादेव कोकरे, महेश कोकरे, शिवाजी मोटे, सहदेव सलगर, ज्ञानेश्वर शिंदे, चंद्रकांत कोकरे आधी शेतकऱ्यांच्या सह्या आहेत.