धाराशिव (प्रतिनिधी)- इज ऑफ लिव्हिंगच्या आदर्श तत्वानुसार वीज ग्राहकांना सेवा देत असताना कंपनीने निर्धारीत केलेल्या ग्राहकसेवेच्या मानका नुसार विहित वेळेत ग्राहक सेवा देणे हे आपले आद्य कर्तव्य आहे. त्यानुसार ग्राहकाभिमूख सेवा द्यावी अन्यथा गंभीर परिणामांना सामोरे जाण्याची तयारी ठेवावी असे निर्देश महावितरणचे संचालक संजय ताकसांडे यांनी दिले.
धाराशिव येथे काल (दि.4) हॉटेल ॲपल येथे पार पडलेल्या लातूर परिमंडल अंतर्गत ग्राहकसेवांसह विविध कामांचा आढावा घेताना संचालक संजय ताकसांडे बोलत होते. यावेळी मुख्य अभियंता सुंदर लटपटे, अधीक्षक अभियंता मदन सांगळे, मकरंद आवळेकर, मधुकर घुमे तसेच छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक कार्यालयाच्या अधीक्ष्क अभियंता श्रीमती कटकधोंड, स्थापत्य विभागाचे अधीक्षक अभियंता श्री काळोगे यांची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलताना संचालक संजय ताकसांडे म्हणाले की, वीजग्राहकांना ‘इज ऑफ लिव्हिंग'प्रमाणे सेवा देण्यास महावितरणने अतिशय गंभीरपणे सुरवात केली आहे. यामध्ये कर्मचाऱ्यांची तत्परता अतिशय़ महत्त्वाची आहे. प्रत्येक वीजग्राहक हे आपले दैवत आहे असे समजून ग्राहकांना सेवा देण्यात कोणतीही कुचराई करू नये. सुरळीत वीजपुरवठा, नवीन वीजजोडणी, अचूक बिलिंग व तक्रारींचे निराकरण त्याचबरोबर वीजबिलांची वसुली यामधील तत्परतेत हयगय खपवून घेतली जाणार नाही असा इशारा संचालक ताकसांडे यांनी दिला. याप्रसंगी सुरवातीला मुख्य अभियंता सुंदर लटपटे यांनी संचालक ताकसांडे यांचे स्वागत केले व परिमंडळातील कामांचे प्रास्ताविक केले. याप्रसंगी लातूर, धाराशिव व बीड मंडळातील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.