धाराशिव (प्रतिनिधी)-बुधवार दि. 1 नोव्हेंबर या दुसऱ्या दिवशीही शहरासह जिल्ह्यात सायंकाळी 5 वाजेपर्यंत संचारबंदी जाहीर केल्यामुळे सर्वत्र जनजीवन विस्कळीत झाल्याचे पहायला मिळाले. संचार बंदीच्या काळातही जिल्ह्यात ठिक-ठिकाणी मराठा आरक्षणासाठी आंदोलन चालूच आहे.

धाराशिव तालुक्यातील खेड येथे 1 नोव्हेंबर रोजी खेड गावातील दोन युवक काका लोमटे व सुजित वीर पाटील मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी टावरवर चढून आंदोलन करत आहेत. आरक्षण न मिळाल्यास व मागण्या मान्य न केल्यास टॉवर वरून उडी घेऊन आत्महत्या करण्याचा इशारा देत आहेत. गावातील अनेक नागरिकांनी त्यांच्याशी संपर्क साधून खाली उतरण्यास विनवणी केली परंतु ते ऐकायला तयार नाहीत. तर कसबे तडवळा येथे ही काही तरूणांनी पाण्याच्या टाक्यावर जावून मराठा आरक्षणासाठी आंदोलन केले. धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकल मराठा समाजाच्यावतीने आजही साखळी उपोषण सुरू आहे. तर आम आदमी पार्टीचे राज्य संघटक ॲड. अजित खोत यांनी मराठा आरक्षणासाठी राजीनामा देत असल्याचे सांगितले आहे. तर धाराशिव तालुक्यातील ढोकी येथे मराठा आरक्षणासाठी 14 जणांनी जमिनीत गाढून घेतले. 

धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सरकारचा निषेध करण्यासाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या प्रतिमेचे सकल मराठा समाजाच्यावतीने दहन करण्यात आले. यावेळी सकल मराठा समाजाच्यावतीने निवासी उपजिल्हाधिकारी यांना मराठा आंदोलनकांवरील गुन्हे मागे घ्या या मागणीसाठी निवेदन दिले. गुन्हे मागे न घेतल्यास जेलभरो आंदोलन करण्याचा इशारा सकल मराठा समाजाच्यावतीने देण्यात आला. जिल्ह्यात मराठा आरक्षणाच्या आंदोलनामुळे 200 लोकांवर गुन्हे नोंद केले असल्याची माहिती देण्यात आली आहे. 


मराठा आरक्षणासाठी स्वतःच्या रक्ताने लिहिले मुख्यमंत्र्यांना पत्र 

धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील देवळाली गावच्या नेमिनाथ मधुकर तांबे या मराठा तरुणाने मराठा समाजाला लवकरात लवकर आरक्षण मिळावे या मागणीसाठी स्वतःच्या रक्ताने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना पत्र लिहून हे पत्र उपविभागीय अधिकारी महसूल भूम यांच्यामार्फत मुख्यमंत्री कार्यालयाला पाठविले आहे.


 
Top