उमरगा (प्रतिनिधी)-मराठा आरक्षणासाठी सुरु असलेले आंदोलन अतिशय शांततेने सुरु आहे. मराठा आंदोलनाला बदनाम करण्यासाठी राज्य सरकारची माणसच गाडया फोडून जाळपोळ करत आहे. मराठा आरक्षणाची लढाई अनेक वर्षांपासून सुरू आहे. वर्षानुवर्षे अन्याय सहन होत नसल्याने शांततेच्या मार्गाने सरसगट कुणबी प्रमाणपत्रासाठीचा लढा सुरुच राहणार आहे. आरक्षण मिळाल्याशिवाय अन्नाचा कण घेणार नाही. आरक्षण मिळेपर्यंत एक इंचही मागे हटणार नाही. आशक्तपणा आला काय किंवा कांहीही झाले तरी उपोषणाची जागा सोडणार नसल्याचा निर्धार उपोषणकर्ते आण्णासाहेब पवार यांनी व्यक्त केला.
मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी व मराठयांना सगसगट ओबीसी मधून आरक्षण मिळावे या मागणीसाठी 25 ऑक्टोबरपासुन उमरगा येथे साखळी उपोषण सुरू आहे. तर आण्णासाहेब पवार हे चार दिवसांपासून अमरण उपोषणाला बसले आहेत. उपोषणस्थळी सकल मराठा समाजाच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मराठा समाजाने शांततापूर्ण मार्गाने लाखोंच्या संख्येने राज्यभरात 58 मुकमोर्चे काढले. मराठा आरक्षणासाठी राज्यातील 60 मराठा बांधवानी आत्महत्येच टोकाच पाऊल उचलल आहे. तरीही या सरकारला मराठ्यांच्या भावनांची जाणीव नाही. राज्यातील अनेक गावात साखळी व अमरण उपोषण सुरू आहे. राज्यभरात गावबंदी होत आहे यामुळे हे सरकार बेधरले आहे. राज्यकर्त्यांची माणस जाळपोळ व उग्र आंदोलन करुन मराठयांना बदनाम करण्याचे हे शडयंत्र असल्याचे आरोप उपोषणकर्ते पवार यांनी यावेळी केला.
सकल मराठा समाजाच्या वतीने व्ही. एम. पाटील यांनी भुमिका मांडताना मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील अमरण उपोषणाला बसल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जरांगे पाटील यांना भेटून एक महिन्यात टिकणारे आरक्षण देण्याचे आश्वासन दिले होते. सरकारला 40 दिवसाचा कालावधी दिला. परंतु सरकारने आरक्षणाबाबत कोणतीही ठोस कारवाई केली नाही. त्यामुळे शांततेच्या मार्गाने हे आदोलन सुरू करण्यात आले आहे. राज्य सरकारने मंगळवारच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत समाजाला वाटाण्याच्या अक्षता दाखवल्या आहेत. सर्वपक्षीय बैठकीत पुन्हा तेच तुणतुणे वाजवले आहे. संपूर्ण राज्यात शांततापूर्ण मार्गाने आंदोलन सुरू असताना सरकार ठोस भूमिका घेत नसल्याचा आरोप व्ही. एम. पाटील यांनी यावेळी केला.