धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील विविध भागात 90 बोगस डॉक्टर कार्यरत असून एकाच दिवशी एकाचवेळी त्यांच्या दवाखान्यांवर छापे टाकून कारवाई करण्याचे नियोजन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात येणार आहे. यासंदर्भात दि. 6 नोव्हेंबर रोजी पार पडलेल्या बैठकीत निर्देश देण्यात आले आहेत.
आरोग्य विभागांतर्गत बोगस डॉक्टर शोधन जिल्हास्तरीय समितीची बैठक दि. 6 नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आली. अनाधिकृत वैद्यकीय व्यवसायिकांचा तालुकानिहाय गोषवारा सादर करण्यात आला. जिल्ह्यात आतापर्यंतच्या सर्वेक्षणामध्ये 90 व्यवसायीकांची नोंद झाली आहे. त्यापैकी तालुकाअंतर्गत विविध पोलिस स्टेशनमध्ये 26 व्यवसायीकांवर अनाधिकृत वैद्यकीय पोलिस तपास सुरु आहे.15 प्रकरणे न्यायालयात प्रलंबित आहेत.तसेच 42 व्यावसायिकांना यादीतून काढून टाकण्यात आले.यामध्ये व्यवसाय बंद केलेले, फरार, मयत आदींचा समावेश आहे.
ग्रामीण स्तरावर कारवाईसाठी तालुका आरोग्य अधिकारी, गटविकास अधिकारी प्रतिनिधी, सहायक पोलिस निरीक्षक, पोलिस उपनिरीक्षक आदींचा समावेश असेलली पथके. तर शहरी भागात अतिरिक्त शल्यचिकित्सक धाराशिव शहराकरिता तर सर्व तालुक्यासाठी वैद्यकीय अधीक्षक, मुख्याधिकारी, पोलिस अधिकाऱ्यांची समिती गठीत केली आहे. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सतिश हरिदास,जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. इस्माईल मुल्ला, जिल्हा प्रजनन व बाल आरोग्य अधिकारी डॉ. कुलदीप मिटकरी, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी तथा सह संचालक कुष्ठरोग डॉ.मारुती कोरे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. फुलारी,जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी रेणुका राठोड आणि सर्व वैद्यकीय अधीक्षक व सर्व तालुका आरोग्य अधिकारी तालुका सर्व जिल्हास्तरीय सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
ग्रामीण व शहरी पथकांनी प्राप्त तक्रारी व माहितीनुसार गुन्हे दाखल न झालेल्या उर्वरित सर्व व्यवसायीकांवर गुन्हे दाखल करावेत व व्यवसाय बंद केलेले व्यवसायीकांनी पुन्हा व्यवसाय चालू केले किंवा नाही याबाबत दक्षता घेण्यात यावी.जर त्यांनी नंतर व्यवसाय चालू केला असेल तर त्यांच्यावर पुन्हा कारवाई करण्यात यावी.असे जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांनी सांगितले.