धाराशिव (प्रतिनिधी)- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने मागील नऊ वर्षात राबविण्यात येत असलेल्या विविध लोककल्याणकारी योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी धाराशिव जिल्ह्यात सुरू झालेल्या 

विकसित भारत संकल्प यात्रेने आज 23 नोव्हेंबर रोजी गुरुवारी  आंबेजवळगा येथे जनजागृती केली. 

यावेळी विकसित भारत संकल्प रथयात्रेचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओंबासे आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी गटविकास अधिकारी भागवत ढवळषंख,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सतीश हरदास,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने, तालुका कृषी अधिकारी एस.पी. जाधव,तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अश्विनी चौधरी,अंबेजवळगा सरपंच वैष्णवी राऊत व उपसरपंच लक्ष्मण जाधव यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

जिल्हाधिकारी डॉ.ओंबासे यांनी केंद्र सरकारच्या विविध योजनांची नागरिकांनी माहिती करून घेऊन त्याचा लाभ घ्यावा.केंद्र सरकारने नागरिकांच्या सुरक्षित आरोग्यासाठी आयुष्यमान भव ही पाच लाखापर्यंतच आरोग्य सुविधा मोफत देण्यासाठी योजना सुरू केली असून त्यासाठी आयुष्यमान कार्ड काढून घेण्याची सोय या संकल्प रथयात्रेदरम्यान केली असल्याची माहिती नागरिकांना दिली. पात्र नागरिकांनी आयुष्यमान कार्ड काढून घ्यावे.केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियान,जनधन,उज्वला गॅस,जीवन ज्योती,किसान सन्मान योजना,फसल बीमा योजना या योजनांचा नागरिकांनी लाभ घेऊन आपले जीवनमान उंचवावे असे आवाहन डॉ. ओंबासे यांनी यावेळी केले. केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियान टप्पा दोन अंतर्गत स्वच्छता अधिक  मिशन अंतर्गत आंबेजवळगा गावाला विशेष प्रमाणपत्र देऊन मॉडेल गाव म्हणून यावेळी स्वच्छ भारत अभियान मिशन कक्षाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी भागवत ढवळशंख व स्वच्छता निरीक्षक गादगे यांच्या हस्ते सरपंच, उपसरपंच आणि ग्रामसेवकांना सन्मानित करण्यात आले.

आंबेजवळगा येथील शबाना सादिक कोतवाल या लाभार्थी महिलेने केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानातून मिळालेल्या शौचालयामुळे ग्रामीण भागातील महिलांची सोय झाली असून केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानाच्या अंमलबजावणीला धन्यवाद दिले.तसेच संजय जाधव यांच्या बालकाच्या हृदयाची शस्त्रक्रिया केंद्र सरकारच्या योजनेमुळे सुखकर झाली आणि आपल्या बालकाचे आयुष्य वाचले आणि आता हे बालक कुपोषणापासूनही दूर असून प्रगती करत आहे असा उल्लेख संजय जाधव यांनी यात्रेसमोर आपले अनुभव कथन करताना सांगितला.

तर अंजुम जलाल शेख या लाभार्थी महिलेने केंद्र सरकारच्या उमेद अभियानामुळे आपला व्यवसाय सुरळीत सुरू झाला. त्यामुळे आपण स्वतःच्या पायावर उभे राहून आत्मनिर्भर झाले असल्याबद्दल प्रधानमंत्री श्री.नरेंद्र मोदी यांचे आभार मानले.

 या संकल्प यात्रेदरम्यान आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य शिबिरात जवळपास 50 ते 60 नागरिकांच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली.पात्र लाभार्थी नागरिकांना केंद्र सरकारच्या आयुष्यमान भव या योजनेतील आयुष्यमान कार्ड काढून देण्यात येत असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अश्विनी चौधरी यांनी यावेळी दिली. प्रारंभी अंबेजवळगाच्या सरपंच वैष्णवी राऊत आणि उपसरपंच लक्ष्मण जाधव यांनी जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे ग्रामस्थातर्फे स्वागत केले.यावेळी ग्रामसेवक विजया पवार यांनी गावातील केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री आवास योजना, जलजीवन मिशन तसेच स्वच्छ भारत अभियानातील विविध लाभार्थ्यांच्या कामांच्या प्रगतीचा अहवाल सादर केला. 

जिल्ह्यात ग्रामीण भागातील विकसित भारत संकल्प यात्रेच्या शुभारंभ प्रसंगी आंबेजवळगा येथील कार्यक्रमाला उपस्थित विविध विभागाचे अधिकारी-कर्मचारी,विविध गावातील सरपंच,उपसरपंच,सदस्य, ग्रामस्थ तसेच उपस्थित नागरिकांना स्वच्छ भारत मिशनचे आरोग्य निरीक्षक हनुमंत गादगे यांनी विकसित भारतासाठी कटीबद्ध होण्याची शपथ दिली.


 
Top