धाराशिव (प्रतिनिधी)-महायुती सरकारने केवळ 100 रुपयात आनंदाच्या शिधा तेल, साखर, डाळ, रवा, मैदा व पोहे या सहा वस्तू दिल्याने गरिब कुटुंबांना नक्कीच आनंद होणार आहे. जिल्ह्यातील सर्व रेशन दुकानांमध्ये आज आनंदाचा शिधा उपलब्ध करून देण्यात आला आहे. अंत्योदय, प्राधान्य कुटुंब व एपीएल शेतकरी शिधापत्रिकाधारक कुटुंबांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केले आहे.

आ. पाटील यांनी काल जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांसह धाराशिवच्या आठही तहसीलदारांबरोबर शिधा वाटपाचा आढावा घेतला. तसेच शहरातील रेशन दुकानाला भेट देऊन शिधापत्रिका धारकाशी चर्चा केली. यावर्षी आनंदाच्या शिधामध्ये दोन वस्तूंची वाढ करण्यात आली आहे. लाभधारक याबाबत अतिशय आनंदी व समाधानी असून शिधा वाटपाची प्रक्रिया प्रभावीपणे सुरू आहे. लाभार्थी देखील उत्स्फूर्तपणे आनंदाचा शिधा घेण्यासाठी येत आहेत. जिल्हा प्रशासनाला दोन दिवसात सर्व लाभार्थ्यांना शिधावाटप करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 

जिल्ह्यातील 2 लाख 92 हजार 354 कुटुंबांना केवळ 100 रुपयात आनंदाचा शिधा मिळत आहे. यामध्ये 1 किलो तेल, 1 किलो साखर तर प्रत्येकी अर्धा किलो चणाडाळ, रवा, मैदा व पोहे या वस्तूंचा समावेश आहे.  आनंदाच्या शिद्याने गोरगरीब कुटुंबाच्या दिवाळीचा आनंद द्विगुणीत झाला असून लाभार्थ्यांकडून शासनाचे आभार व्यक्त करण्यात येत आहेत.यावेळी भाजपा माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे, स्वस्त धान्य दुकानदार पी.बी.तोडकरी, दिनेश देशमुख, मनोज देशमुख, पंडित मंजुळे, अतुल चव्हाण आदी उपस्थित होते.


 
Top