नळदुर्ग (प्रतिनिधी)- सुंदर बसस्थानक अभियानात नळदुर्ग बसस्थानकाने 53 गुण मिळवुन जिल्ह्यात तिसरा क्रमांक पटकावला आहे.
हिंदु ह्रदयसम्राट कै. बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियान सर्वेक्षण उपक्रमांतर्गत नळदुर्ग बसस्थानकाने या कामगिरीमध्ये जिल्ह्यात तीसरा क्रमांक पटकाविला आहे.येथील वाहतुक नियंत्रक महेश डुकरे व स्वच्छता कर्मचारी भीमा गायकवाड यांचा या यशामध्ये सिंहाचा वाटा आहे.
सुंदर बसस्थानक अभियानात जिल्ह्यातील 16 बसस्थानकामध्ये नळदुर्ग बसस्थानकाने तिसरा क्रमांक पटकाविला आहे. नळदुर्ग बसस्थानक कायम स्वच्छ राहते कारण या बसस्थानकात स्वच्छता कर्मचारी म्हणुन नेमणुकीस असलेले भीमा गायकवाड हे बसस्थानक स्वच्छतेचे काम थातुरमातुर न करता अतीशय प्रामाणिकपणे व चांगल्या पद्धतीने करतात. बसस्थानक व परीसर झाडुन स्वच्छ केल्यानंतर भीमा गायकवाड हे बसस्थानक व परीसरात पडलेले कागदाचे तुकडे असतील किंवा बारीक दगड, गोटे असतील ते गोळा करून कचरा कुंडीत टाकतात त्यामुळे बसस्थानकात सर्वत्र स्वच्छता राहते. त्याचबरोबर बसस्थानकातील मुतारी व स्वच्छतागृहाचीही कायम स्वच्छता ठेवली जाते.
नळदुर्ग बसस्थानकात गेल्या सहा वर्षांपासुन कार्यरत असलेले वाहतुक नियंत्रक महेश डुकरे यांच्या प्रयत्नातुन आज बसस्थानक परीसर हिरव्या वनराईने नटला आहे. महेश डुकरे यांनी विविध जातींची शेकडो झाडे लावुन त्याची जोपासना केली आहे. यामध्ये अंबा, चिंच, पेरू, बदाम, लिंब, वड, पिंपळ, नारळ यासह उपयुक्त झाडांचा समावेश आहे. त्यामुळेच नळदुर्ग बसस्थानक सुंदर बसस्थानक अभियानात जिल्ह्यात तिसरे ठरले आहे. याचे सर्व श्रेय वाहतुक नियंत्रक महेश डुकरे, श्री हंडे व स्वच्छता कर्मचारी भीमा गायकवाड यांना जाते.