धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील वीज सेवा सुधारण्यासाठी लोकप्रतिनिधींनी केलेल्या सूचना रास्त आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठिंब्याने वीज वितरण जाळे बळकट करण्यासाठी देशभर आरडीएसएस योजना हाती घेण्यात आली आहे व त्यापैकी धाराशिव जिल्ह्यात 1177 कोटी रुपयांची कामे होणार आहेत. पंतप्रधानांची योजना धाराशिव जिल्ह्यात वीज सेवा सुधारण्यासाठी उपयुक्त ठरेल, असे प्रतिपादन एमएसईबी होल्डिंग कंपनीचे स्वतंत्र संचालक मा. विश्वास पाठक यांनी मंगळवारी धाराशीव येथे केले.

महावितरण, महापारेषण, महाऊर्जा आणि विद्युत निरीक्षक विभाग यांच्या कामाचा आढावा घेण्यासाठी आयोजित जिल्हा आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार ज्ञानराज चौगुले, आमदार राणाजगजितसिंह पाटील (ऑनलाईन), आमदार कैलास पाटील (ऑनलाईन), जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे, महावितरणचे मुख्य अभियंता सुंदर लटपटे आणि महापारेषणचे मुख्य अभियंता अविनाश निंबाळकर उपस्थित होते.

विश्वास पाठक म्हणाले की, धाराशिव जिल्ह्यात वीज सेवा सुधारण्यास भरपूर वाव आहे. वीज सेवा सुधारण्यासाठी लोकप्रतिनिधींनी केलेल्या नवीन उपकेंद्रे उभारणे, वीज जाळे मजबूत करणे, नवे अधिक क्षमतेचे ट्रान्सफॉर्मर बसविणे अशा सूचना महत्त्वाच्या आहेत. लोकप्रतिनिधींच्या सूचनांची दखल घेण्यात आली असून त्यातील बहुतेक कामे आरडीएसएस योजनेत हाती घेण्यात आली आहेत. ही कामे आगामी अठरा महिन्यात पूर्ण होतील व त्यानंतर जिल्ह्यातील वीज सेवा खूपच सुधारलेली दिसेल.

त्यांनी सांगितले की, जिल्ह्यामध्ये कृषी ग्राहकांचे प्रमाण खूप मोठे आहे. या जिल्ह्यात सौर ऊर्जा निर्मितीची 2300 मेगावॅट इतकी मोठी क्षमता आहे. शेतकऱ्यांना दिवसा नियमित वीज पुरवठा करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेस चालना दिली आहे. ही योजना शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार आहे. जिल्ह्यातील वीज निर्मितीची क्षमता ध्यानात घेऊन आगामी काळातील मागणीचा अंदाज घेऊन महापारेषणकडून पायाभूत सुविधा विकसित करण्यात येत आहेत, हे स्वागतार्ह आहे.

इतर जिल्ह्यांच्या तुलनेत धाराशिवमध्ये वीज वितरण हानी अधिक आहे. जिल्ह्यात वीज बिल वसुलीसाठी अधिक प्रयत्न करावेत, अशी सूचनाही मा. पाठक यांनी केली. आमदार ज्ञानराज चौगुले, आमदार राणा जगजितसिंह व आमदार कैलास पाटील यांनी वीज ग्राहकांच्या विशेषतः कृषी ग्राहकांच्या समस्या मांडल्या. कृषी पंप जोडलेल्या ट्रान्सफॉर्मर्सच्या बाबतीत अधिक सुधारणा करण्याची मागणी त्यांनी केली.


 
Top