नळदुर्ग (प्रतिनिधी)-मौजे वागदरी येथे बंदिस्त नाली कामाचे लोकार्पण,मराठा स्मशानभूमी सुशोभीकरण व मुस्लिम स्मशानभूमी सिमेंट रस्ता भूमिपूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

प्रारंभी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातील प्रशासकीय अधिकारी तथा सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास संतोष राऊत,मुख्य जिल्हा सरकारी वकील ॲड.शरद जाधवर,नळदूर्ग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्निल लोखंडे, ॲड.जनक पाटील,राज्य पोलीस तक्रार प्राधिकरणाचे उमाकांत मिटकर यांचे ग्रामस्थानी जंगी स्वागत केले. 

गावामध्ये एक किलोमीटर रांगोळी काढून फुलांच्या पाकळ्या अंथरण्यात आल्या होत्या.टाळ मृदंगाच्या गजरात राम-कृष्ण हरीच्या जयघोषात टाळकऱ्यांनी पावले खेळत, महिलांनी जागोजागी औक्षण करत हलग्यांच्या कडकडाटात, फटाक्यांची आतीशबाजी करत गावकऱ्यांनी उत्साह पूर्ण वातावरणात स्वागत केले. 

या अभूतपूर्व स्वागताने आणि उत्साहाने मान्यवर भारावून गेले. यावेळी मिटकर कुटुंबीयांच्या वतीने गावातील शंभर भगिनींना भाऊबीजेची साडी-चोळी भेट देण्यात आली.उपस्थित मान्यवरांनी अल्पावधीतच गावचा सुरू असलेला विकास पाहून समाधान व्यक्त केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.संतोष पवार यांनी तर कार्यक्रमाचे संयोजन ज्ञानराज मित्र मंडळाचे श्री.किशोर सुरवसे यांनी केले होते.यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.


 
Top